स्थैर्य, नवी दिल्ली,दि.३०: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कृषी कायद्यांविरोधात लढा देणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने देशभर सद्भावना दिवस पाळला. या दिवशी सर्वांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आम्ही केले होते.
त्यानुसार निदर्शन स्थळासह सर्व देशभर उपवास करण्यात आला. दरम्यान प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी किमान 84 जणांना अटक केली. तर हरीयाणा सरकारने इंटरनेट खंडीत करण्याच्या कातवाईस मुदतवाढ दिली आहे. काल हिंसाचार झालेल्या सिंघू सीमेवर आज मोठा बंदोनस्त तैनात करण्यात आला होता.
सिंघू, गाझीपूर आणि टीकरी सीमेवर निदर्शक पुन्हा मोठ्या संख्येने गोळा होऊ लागताच तीनही सीमेवर इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली. त्याला शुक्रवारी मुदतवाढ देण्यात आली. दिल्ली पोलिसांनी अधिक संख्येने लोक निदर्शनांकडे फिरकू नयेत म्हणून राष्ट्रीय महामार्ग 24 वरील वाहतूक बंद केली आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारचे पुरावे गोळा करण्यासाठी न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथक लाल किल्लयावर शनिवारी दाखल झाले.
सिंघू सीमेवर सुमारे 200 जणांचा जमाव तीन बॅरिकेड्स तोडून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर चालून गेला. त्यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला करणाऱ्या 22 वर्षीय तरूणासह 84 जणांना अटक करण्यात आली, असे दिल्ली पोलिसांनी शनिवारी सांगितले.
सिंघू सीमेला छावणीचे स्वरूप
सिंघू सीमेवर तथाकथित स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर शुक्रवारी हल्ला चढवला. त्यानंतर शनिवारी या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. तेथे आज पोलिस आणि निमलष्करी जवानांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, निदर्शनस्थळांवर पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा ओघ निदर्शन स्थळांकडे येत आहे. त्यामुळे गुरूवारी तुरळक निदर्शकांच्या जागी आता मोठ्या संख्येने निदर्शक जमा झाल्याचे चित्र दिसत आहे.
प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला उतरती कळा लागली होती. मात्र राकेश टिकेत यांनी केलेल्या आवाहनामुळे या आंदोलनाचे पुनरूज्जीवन झाले आहे. आम्ही पंजाबात नेऊन त्यांचा सत्कार करणार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीर सिंग राजेवाल यांनी पत्रकारांना सांगितले.