
दैनिक स्थैर्य । 5 जून 2025। बारामती । उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन क्रिमोलिअर असे विविध दाखले आणि कामांसाठी पालक आणि विद्यार्थी यांची महा ई सेवा केंद्रांत गर्दी होत आहे. परंतु शासनाचे अधिकृत संकेतस्थळ बंद असल्याने दाखल्यांसाठी विलंब होत आहे. दुसरीकडे, पालक आणि विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
सध्या दहावी आणि बारावीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू आहे. प्रवेशासाठी आवश्यक दाखले घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्र आणि महा ई सेवा केंद्रांत विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे. राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण, हे संकेतस्थळ गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बंद (डाऊन) पडले आहे. त्यामुळे अर्जच दाखल करण्यास अडचण येत आहे. नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ज्या नागरिकांना अर्ज दाखल करायचे आहेत. त्यामधील बहुतांश जणांना अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे सध्या सर्व्हर डाऊन असल्याने माहिती घेण्यासाठी सायबर कॅफेकडे हेलपाटे मारावे लागत आहे.
दरम्यान, राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ हे नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्टया अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यासाठी 26 मे 2025 पासून या संकेतस्थळाची सेवा बंद राहील, असे राज्य माहिती तंत्रज्ञान महामंडळाने कळविले आहे. या कालावधीत शासनाच्या संकेतस्थळावर कोणतीही सेवा उपलब्ध राहणार नाही. याची सर्वसामान्य नागरिक आणि शासकीय अधिकारी कर्मचार्यांनी नोंद घ्यावी, आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
बारामती तालुक्यात 78 ठिकाणी महा-ई सुविधा केंद्र असून सुद्धा तालुक्यातील नागरिक तहसील कार्यालयातील केंद्रात सर्वाधिक येतात त्यामुळे गर्दी जास्त होते व नागरिकांची गैरसोय होते त्यात सर्व्हर वारंवार बंद होत असल्याने नागरिक पालक व विद्यार्थी यांना अडचण निर्माण होत आहे.
सध्या पालकांची विविध दाखले
काढण्यासाठी मागणी होत आहे परंतु अधिकृत संकेतस्थळ हे नियमित देखभालीबरोबरच
तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्याचे काम चालू आहे त्यामुळे काही काळ चालू राहते व पुन्हा बंद रहाते . त्यामुळे पालकांना दाखल्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे तरीही लवकरात लवकर उत्कृष्ट सेवा देऊन पालक व विद्यार्थी यांची अडचण होणार नाही याची दक्षता घेतली जाईलगणेश शिंदे, तहसीलदार बारामती
पालक व विद्यार्थी, नागरिक यांची गैरसोय होऊ नये म्हणून सेतू महा-ई-सेवा केंद्र व नागरी सुविधा केंद्रातील कर्मचार्यांना सर्व्हर बंद असल्याने रात्री किंवा पहाटे कागतपत्रे डाउनलोड करण्यासाठी यावे लागते.
नासिर शेख, महा ई सेवा केंद्र चालक, बारामती तहसील कार्यालय
शासनाने मार्च एप्रिल मे मध्ये देखभाल साठी बंद ठेवणे आवश्यक होते परंतु जून महिन्यात प्रवेश प्रक्रिया वेळी बंद ठेवल्याने पालक, विद्यार्थी व सामान्य नागरिक यांना त्रास सहन करावा लागतो व वेळ वाया जातो आणि एजंट यांना फायदा होतो.
संतोष दुधाळ, इंजिनिअरिंग प्रवेश घेणारा विद्यार्थी