
स्थैर्य, सातारा, दि.४: सातारा येथील एमआयडीसीमध्ये असणाऱ्या एका कंपनीच्या सेल मोल्डींग मशीनवर काम करत असताना त्यामध्ये अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला. उमेश पवार असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव असून याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, उमेश मुगूटराव पवार (वय ५५, रा. नलवडेवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) हे शनिवार, दि. २ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सातारा एमआयडीसीमध्ये असणाऱ्या संग्राम इंटरप्रायझेस कंपनीत सेल मोल्डींग मशीनवर काम करत होते. यावेळी ते मशीनमध्ये अडकले आणि बेशुध्द पडले. यानंतर त्यांना उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी दिली. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.