

श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडीच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारे दत्तात्रेय चव्हाण (तात्या) यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
स्थैर्य, फलटण, दि. ११ मे : चव्हाणवाडी (ता. फलटण) येथील श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूलच्या स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय दत्तात्रेय बाबुराव चव्हाण ऊर्फ तात्या यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती:
दिनांक ९ मे रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात परिसरातील शिक्षणप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर ११ मे रोजी श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक विठ्ठल निकाळजे, मालोजीराजे विद्यालयाचे उपप्राचार्य आबा धायगुडे, बर्गे सर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तात्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच प्रशांत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गोरख शिंदे, उद्योजक सचिन अहिरेकर, किशोर शिंदे, ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र राजपुरे, प्रदीप क्षीरसागर, सुरेश भोईटे, धापड सर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वतःचे घर आणि ४० गुंठे जमीन दिली विद्यालयाला:
सन १९९२ मध्ये चव्हाणवाडीत विद्यालय स्थापन करण्यात तात्यांचा सिंहाचा वाटा होता. सुरुवातीच्या काळात हे हायस्कूल त्यांच्या राहत्या घरात भरत होते. स्वतःसाठी केवळ एक खोली ठेवून त्यांनी उर्वरित जागा शाळेला दिली. तसेच स्वतःची ४० गुंठे जमीन विद्यालयाच्या बांधकामासाठी विनामोबदला संस्थेच्या नावे केली. शिक्षकांना पगार नसताना धान्य गोळा करून त्यांची व्यवस्था करण्यासारखे त्यागपूर्ण काम त्यांनी केले. त्यांच्या या कार्याचा ग्रामस्थांनी “स्वतः झिजून इतरांना सुगंध देणारे चंदन” अशा शब्दांत गौरव केला.
विद्यालयात अद्ययावत सोयी-सुविधा:
सध्या मुख्याध्यापक विठ्ठल निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व कमिन्स इंडिया कंपनीच्या सीएसआर (CSR) निधीतून विद्यालयात आमूलाग्र बदल झाले आहेत. यामध्ये कंपाऊंड, अत्याधुनिक स्वच्छतागृहे, इंटरॲक्टिव्ह पॅनेल बोर्ड, संगणक, एआय (AI) प्रशिक्षण वर्ग, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा यांसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
विद्यालयाच्या या प्रगत स्वरूपाची आणि तात्या यांच्या त्यागमय कार्याची दखल घेत रयत शिक्षण संस्थेने त्यांची जनरल बॉडी सदस्यपदी निवड केली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.