स्थैर्य, म्हसवड दि. ३ : मुंबईच्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्काराने’ माणचे डँशींग पत्रकार फिरोज तांबोळी यांना सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सोहळ्यात प्रातिनिधिक स्वरूपात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेली वीस वर्षे दै सकाळच्या माध्यमातून फिरोज तांबोळी हे पत्रकारिता करत आहेत.गोंदवले बुद्रुक येथील बातमीदार म्हणून ते कार्यरत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,शेती आदी क्षेत्रात पत्रकारितेतुन योगदान दिले. विशेषतः दुष्काळी माण तालुक्यातील गावांमध्ये लोकसहभागातून सुरू असलेल्या जलसंधारण कामांना त्यांनी आपल्या लेखणीतून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.यातुनच अनेक गावांना दुष्काळमुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू ठेवण्यास मोठी मदत झाली होती. याशिवाय दै. सकाळचा तनिष्का व्यासपीठ गट गोंदवले बुद्रुक येथे स्थापन करून त्याद्वारे गावातील सामाजिक कामे करण्यात त्यांनी योगदान दिले.पत्रकारितेतुन दिलेल्या योगदानाची दाखल घेऊन गुणिजन गौरव महासंमेलनात मुंबईच्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प केशव महाराज व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्काराने फिरोज तांबोळी याना सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे केशव महाराज यांनी केलेल्या बीजभाषणात ह भ प पुरस्कार मानकरी गुणवंतांनी पुरस्काराच्या प्रेरणेतून आपले भारत राष्ट्र अधिक शक्तिशाली आणि संपन्न बनविण्यासाठी आपले संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन केले. दुर्जन शक्तीच्या वाढत्या प्रादुर्भावाला जर पराभूत करायचे असेल तर तुमच्या सारख्या गुणवंतांच्या सज्जन शक्तीचे संघटन देशात निर्माण व्हायला हवे असेही प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अशोकानंद जी जवळगावकर, ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर, सुप्रसिद्ध आदर्श शिक्षिका श्रीमती मनिषा कदम घार्गे, श्रीमती रोशनी शिंदे, श्रीमती कल्पिता पर्शराम तसेच आयकर अधिकारी श्रीमती अरुणा परब यांनी या समारंभाला विशेष पाहुणे म्हणून ऑनलाईन उपस्थिती नोंदविली आणि व्हिडिओद्वारे आपले शुभ संदेश दिले. या राज्यस्तरीय ऑनलाईन समारंभाचे व्यवस्थापन राजेंद्रदादा सरोदे यांनी पाहिले. या पुरस्काराबद्दल फिरोज तांबोळी यांचे माण तालुका मराठी पत्रकार संघासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.