स्वयंसिद्धा महिला समूहातर्फे ‘दांडिया रास’ स्पर्धेचे आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अभिनेत्री सानिका भोईटे ठरली मुख्य आकर्षण; विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवले

स्थैर्य, फलटण, दि. २९ सप्टेंबर : फलटण येथील स्वयंसिद्धा महिला उदयोग समूहाच्या वतीने महाराजा मंगल कार्यालयात ‘दांडिया रास स्पर्धा २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या प्रहरात झालेल्या या कार्यक्रमात लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत महिलांनी पारंपरिक पद्धतीने गरबा आणि दांडिया नृत्याचा मनमुराद आनंद लुटला.

या कार्यक्रमाचा शुभारंभ सौ. गौरीताई पाटील, स्वयंसिद्धा समूहाच्या अध्यक्षा ॲड. सौ. मधुबाला भोसले, सौ. सुजाता यादव, सौ. शिवांगी बोरावके, सौ. प्रतिभाताई शिंदे, सौ. काजल भोईटे आदी मान्यवरांच्या हस्ते झाला. अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सानिका भोईटे यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली.

विद्यूत रोषणाईने सजवलेल्या मंचावर पारंपरिक घागरा-चोळी वेशात महिलांनी हिंदी-मराठी गीतांच्या ठेक्यावर लयबद्ध नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शहरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांनी आपली दैनंदिन जबाबदारी बाजूला ठेवून या दांडियाचा आनंद लुटला.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून मलाबार गोल्ड अँड डायमंड, बारामतीचे रोहीत अवूदे आणि सौ. चैत्राली उबाळे यांनी काम पाहिले. स्वयंसिद्धाच्या संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले यांनी स्वागत व आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या दांडिया ग्रुप्सना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

Back to top button
Don`t copy text!