
स्थैर्य, फलटण, दि. २३ सप्टेंबर : फलटण तालुक्यासह मोठ्या भूभागासाठी वरदायिनी ठरणाऱ्या नीरा प्रणालीतील सर्व प्रमुख धरणे आज, दि. २३ सप्टेंबर रोजी पूर्ण क्षमतेने भरली आहेत. भटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी या चारही धरणांमध्ये मिळून एकूण ४८.३३ टीएमसी म्हणजेच १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र, फलटण शहरातून जाणाऱ्या नीरा उजवा कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू असल्याने, धरणे भरलेली असूनही नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आजच्या अहवालानुसार, नीरा प्रणालीतील सर्व धरणे शंभर टक्के भरल्याने आगामी काळातील पाण्याची चिंता मिटली आहे. वीर धरणाच्या सांडव्यावरून नीरा नदीच्या पात्रात ३२०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे धरणे तुडुंब भरलेली असताना, फलटण शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या कॅनॉलचे जिंती नाका ते रावरामोशी पूल या दरम्यान अस्तरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामामुळे कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात आलेले नाही. केवळ पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी काही दिवसांच्या अंतराने पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे फलटण शहर, कोळकी, जाधववाडी आणि इतर उपनगरांमधील नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

