पावसाने पिके भुईसपाट झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि. ०९ : जून-जुलैमघ्ये तुरळक स्वरूपात पडलेल्या पावसाचा अपवाद वगळता विश्रांती घेतलेला पावसाने गेल्या दोन/तीन दिवसात जोर पकडला आहे. मुसळधारेसह बरसणारा पाऊस खरीप पिकांना उपयुक्त ठरला आहे. मात्र पावसाबरोबर जोरदार वार्‍यामुळे उंच वाढलेल्या ऊस, मका, ज्वारी अशी पिके मात्र पावसाने भुईसपाट होत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना नुकसानीचा फटकाही बसण्याची शक्यता वाढत आहे.

चालू वर्षी उन्हाळ्यात वळिवाने आणि जून महिन्याच्या पहिल्यांदाच आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाल्याने जमिनीच्या मशागती उरकून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांनी जूनच्या दुसर्‍या आठवड्यात धुमधडाक्यात खरीप पेरण्या सुरू केल्या. शेतकर्‍यांनी ताबडतोब पेरण्या सुरू करू नयेत, असा सल्ला कृषी खात्याच्या वतीने दिला जात होता. मात्र तिकडे दुर्लक्ष करून शेतकर्‍यांचा धडाक्यात पेरण्या उरकून घेण्याकडे कल होता व पेरण्या उरकल्याही.

जूनमध्ये पेरण्या उरकल्या नंतर आठ / पंधरा दिवसात उगवणही चांगली झाली तर पावसानेही सलग वीस/पंचवीस दिवस उघडीप दिल्याने भांगलण, कोळपणी व अन्य आंतरमशागती आरामात करून घेता आल्या. त्याचा तणनाश होण्यास चांगला लाभ झाला तर 8/9 जुलै नंतर पावसाच्या हालक्या सरी येत राहिल्याने पीक वाढीला त्या उपयुक्त ठरल्याने आजपर्यंत खरीप पिके दमदार आहेत.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले तर दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा मुसळधार सुरुवात केली आहे. त्याचा लाभ खरिपाला होईल हे नक्की. मात्र पावसाबरोबरच वेगाने वाहणारे वादळी वारे हा चिंताजनक विषय बनत चालला आहे. कारण पीक परिस्थिती चांगली असल्याने पिकांची वाढ चांगल्या प्रकारे झाली आहे. ज्वारी, भात, ऊस व अन्य पिकांची उंची वाढली आहे. अशी पिके मोठ्या सोसाट्याच्या वार्‍याने भुईसपाट होत आहेत. त्याचा अनिष्ट परिणाम होऊन नुकसान होण्याची शक्यता वाढत आहे.

पावसाचे आगमन सध्या पिकासाठी पोषक आहे. भातासारख्या पिकाला अधिक लाभदायक आहे. मात्र पावसासोबत जोरदार वार्‍यामुळे अनेक ठिकाणी पिके जमीनदोस्त होऊन शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाची उघडझाप व उन्हाच्या झळा असल्या तरच अन्य पिकांना दाणे भरण्यासाठी लाभ अन्यथा नुकसानच होईल.

       उत्तमराव माने, शेतकरी, मान्याचीवाडी


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!