दैनिक स्थैर्य | दि. 08 डिसेंबर 2023 | फलटण | महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित मूकबधिर शाळेच्या माध्यमातून दादासाहेब चोरमले व सौ. वैशाली चोरमले यांनी जे एवढे मोठे कार्य उभारले आहे. या कार्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही; असे गौरवोद्गार फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी काढले.
मूकबधिर शाळेच्या माध्यमातून दिव्यांग सप्ताहाच्या निमित्ताने मूकबधिर विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळावे यासाठी विविध स्टॉल्स उभारण्यात आलेले होते. याचे उद्घाटन फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे, माजी नगरसेविका सौ. वैशाली चोरमले, विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे, युवा उद्योजक बापूराव शिंदे, जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष श्रीपाल जैन, संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ. जैन यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित मूकबधिर शाळेमध्ये जवळपास पाच सात वेळा मी स्वतः आलेलो आहे. या ठिकाणी चालणारे काम हे कोणतीही अपेक्षा न करता किंवा मिळणाऱ्या मदतीतून मूकबधिर मुलांसाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत असतात. व्यक्तिगत कोणताही फायदा न ठेवता या ठिकाणी कामकाज सुरू आहे. जिल्ह्यामध्ये किंवा राज्याच्या इतर भागात शासनाच्या माध्यमातून मूकबधिर विद्यालय सुरू आहेत. परंतु खाजगी मूकबधिर विद्यालय चालवणे ही सोपी गोष्ट नाही; असेही यावेळी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी स्पष्ट केले.
ही जी मूकबधिर मुलं आहेत; हुशार आहेत; अतिशय बुद्धिमान मुले आहेत. परंतु काही कारणास्तव त्या बिचार्यांना बोलायला आणि ऐकायला येत नाही. त्याच्यामुळे ही मुलं जी आहे ती समाजाच्या प्रवाहामध्ये आपल्या सोबत राहू शकत नाहीत. ही जी गोष्ट आहे ही दूर करण्याचे काम म्हणजे त्याला सोबत आणण्याचे काम जे आहे ते या शाळेमार्फत होत आहे; असेही यावेळी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी स्पष्ट केले.
महात्मा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले यांनी प्रास्ताविक केले तर संस्थेच्या सचिव सौ. वैशाली चोरमले यांनी आभार मानले.