दैनिक स्थैर्य | दि. ८ डिसेंबर २०२३ | फलटण |
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यास सक्त आदेश दिलेले आहेत की, कोणत्याही प्रकारे ‘गो हत्ये’साठी ‘गो तस्करी’ होणार नाही यासाठी सतत कार्यरत राहून आरोपींवर कारवाई करा. प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरपणे वागवण्याच्या कायद्यानुसार होणार्या करवाईला अग्रक्रम देवून गुन्हे दाखल करा, अशा सूचना केल्या आहेत.
या सूचनांच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत विशेष नाकाबंदी सुरू केलेली आहे. बरड भागात या कायद्यान्वये कारवाईबाबत सतत फोन येत असतात. त्या ठिकाणी रात्री साध्या कपड्यांमध्ये नाकाबंदी लावण्यात आलेली होती. पहाटे साडेतीन वाजता साठे फाटा या ठिकाणी पिकअप टेम्पो (एम एच १० ए क्यू ७९५०) या गाडीमध्ये पाच जर्सी गाय दाटीवाटीने क्रूरपणे भरलेल्या होत्या. सदर गाई पाहता त्या कत्तलीसाठी जात आहेत, हे दिसून आले. त्या ठिकाणी चालक हर्षद जैनुद्दीन काजी (वय २४ वर्षे, राहणार नेवासे वस्ती, बारामती) व त्याला मदत करणारा अफ्ताब मुबारक पठाण (वय २२ वर्ष, मोरगाव रोड, खंडोबा नगर) या दोघांनाही पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
यावेळी पाच जर्सी गाईंची त्या ठिकाणी तात्काळ सुटका करण्यात आली. दोन लाखांच्या तस्करीसाठी जाणार्या जर्सी गाई व वाहतूक करणारा चार लाखांचा वरील क्रमांकाचा टेम्पो पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींसह ताब्यात घेतला व दोन्ही आरोपींना पोलीस ठाण्यात आणून त्यांना अटक करण्यात आली. तसेच जर्सी गाई या राजाळेतील गोशाळेत सोडण्यात आल्या. यापुढेही अचानकपणे अशा नाकाबंदी लावून कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार चांगण, साबळे, अभंग, काकडे, सोमनाथ टिके यांनी केलेली आहे. पोलीस शिपाई सोमनाथ टिके यांनी सरकारतर्फे पोलीस ठाण्यास फिर्याद देऊन गुन्हा क्रमांक १६६९ /२३ प्राणी संरक्षण अधिनियम १९६० कलम पाच ए बी व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्याचा अधिनियम कलम ११ तसेच वाहतूक कायद्याच्या कलमाप्रमाणे कारवाई केलेली आहे. सदर आरोपींना पोलीस कोठडी रिमांडसाठी माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.