दैनिक स्थैर्य | दि. ४ मार्च २०२४ | सातारा |
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा म्हणजेच सिव्हील हॉस्पिटलमधील ‘सीटी स्कॅन’ मशीन गेल्या १५ ते २० दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. ज्या रुग्णांना ‘सीटी स्कॅन’ करण्याची तातडीची गरज आहे, त्यांना सीटी स्कॅन मशीन बंद असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या बाबीकडे रुग्णालयाचे वरिष्ठही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. मात्र, हे मशीन तातडीने दुरूस्त व्हावे, अशीच मागणी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
गोरगरीबांसह गरजू रुग्णांना मोफत सर्वप्रकारचे उपचार मिळण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात सर्वसाधारण रुग्णालये उभारण्यात आली आहेत. या रुग्णालयांमध्ये रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयांवर शासन हजारो कोटी रुपये खर्च करीत असते. या रुग्णालयांतील एखादी आरोग्य तपासणी मशीन जर बंद पडली तर गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होतात. असाच प्रकार सध्या सातारा सिव्हील हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. या हॉस्पिटलमधील सीटी स्कॅन मशीन गेल्या १५ ते २० दिवसांपासून बंद आहे. मात्र, याकडे वरिष्ठांचे लक्ष नसल्याने अद्याप ती दुरूस्त झालेली नाही. मात्र, हे मशीन बंद असल्याने गरजू गरीब रुग्णांना सीटी स्कॅन सुविधा मिळत नाही. त्यासाठी त्यांना बाहेर खाजगी डायग्नोस्टीक सेंटरवर हजारो रुपये खर्च करून सीटी स्कॅन करावे लागत आहे. त्यामुळे सातारा सिव्हील हॉस्पिटलमधील सीटी स्कॅन मशीन तातडीने दुरूस्त करावे, अशी मागणी रुग्णांसह नातेवाईकांकडून होत आहे.