संचारबंदी मोडून गर्दी जमवणार्‍या बर्थडे बॉयसह तिघांवर गुन्हा


स्थैर्य, सातारा, दि.०२: कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले तरी रस्त्यावर गर्दी जमवून वाढदिवस साजरा करणार्‍या बर्थ डे बॉय आणि त्याच्या मित्रांना शाहूपुरी पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवला. याप्रकरणी मंगेश मधुकर देवकर वय 18, रा. गुरुवार पेठ सातारा (बर्थडे बॉय) व त्याचे साथीदार गुंड्या कांबळे वय 19, रा. प्रतापसिंहनगर सातारा व अजिंक्य देशमुख रा. गोडोली यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, शाहुपूरी पोलीस पेट्रोलिंग करत असताना दुपारी 12.30 च्या सुमारास न्यु इंग्लिश स्कुल सातारा याठिकाणी काही मुले जमाव जमवून वाढदिवस साजरा करत असल्याची माहिती पोलिसांना वायरलेस वरून मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याठिकाणी जावून खात्री केली असता काही मुले सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवुन वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसले. पोलीस गाडी बघून जमलेली मुले पसार झाली. त्याठिकाणी पोलिसांनी चौकशी केली असता बर्थडे बॉय मंगेश मधुकर देवकर याच्यासमवेत गुंड्या कांबळे, अजिंक्य देशमुख इतर पाच ते सहा मुले असे असल्याचे सांगितले. जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांचे संचारबंदीचे आदेश असताना आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र कोविड 19 अधिनियमनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!