दैनिक स्थैर्य । दि.०५ फेब्रुवारी २०२२ । सातारा । सातारा येथील मे जय माता इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीतील तीन संचालकांनी १९ कोटी ३९ लाख ५९ हजार २९३ रुपयांची शासकीय कराची रक्कम शासकीय तिजोरीत भरलीच नाही. याप्रकरणी त्यांच्या विरोधात राज्यकर उपायुक्तांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर वानवडी, पुणे येथील जिंदाल कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अद्याप कोणालााही अटक करण्यात आली नाही.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यकर उपायुक्त साई तुषार वाघचौरे वय ४३, रा. चंद्रभागा गार्डन, शाहूनगर, सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, कोडोली, ता. सातारा येथील औद्योगिक वसाहत परिसरात मे जय माता इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी कार्यरत आहे. या कंपनीचे संचालक म्हणून ज्योती अशोक जिंदाल, रोहित अशोक जिंदाल, अशोक सवरलाल जिंदाल सर्व रा. लव्हेंडर विंग, रहेजा गार्डन, वानवडी, पुणे हे कामकाज पाहतात.
या संचालकांनी २०१३/१४ ते २०१६/ १७ या कालावधीतील विक्रीकर थकबाकी रुपये १९ कोटी ३९ लाख ५९ हजार २९३ एवढी आहे. त्यांना वेळोवेळी नोटीस पाठवून ही त्यांनी ते भरले नसल्याने शासनाची आर्थिक हानी झाली आहे. याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कलमानुसार जिंदाल कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे.