स्थैर्य, फलटण, दि २२: मुघल आक्रमक भारतात येण्यापूर्वी भारतातले सगळे राजे रजवाडे व संस्थानिक अतिशय गुण्यागोविंदाने राहात होते, कुठल्याही लढाया होत नव्हत्या, सगळ काही सुशेगात आणि आबाद होत अशी कुठलीही नोंद इतिहासात सापडत नाही.
त्यावेळच्या काळात चांगल्या राजाचे निकष कोणते होते ?जो राज्यविस्तार करतो, जो भरमसाठ संपत्ती अर्जित करतो, सीमा वाढवतो आणि राज्याला स्थैर्य, सुरक्षा पुरवून रयतेची काळजी घेतो.
त्यावेळची इथली सामाजिक रचना आणि प्रशासकीय रचना नेमकी कशी होती ?त्यावेळी करकचून बांधलेली जातीव्यवस्था समाजात होती, ती उतरंड कुणीही मोडत नव्हत. प्रशासनात सुभेदारी-वतनदारी पद्धत होती. मोठ्या राजाच्या अंकित असणारे मांडलिक राजे, त्यांच्या राज्यात असणारे सुभेदार आणि सुभ्यात असणारे वतनदार आपापल्या फौजा बाळगून महसूल गोळा करून ठराविक वाटा आपल्याला ठेवून बाकीचा वाटा पुढे पाठवत. साहजिकच रयतेकडून जास्तीत जास्त महसूल मिळवणे हेच त्यांचे उद्दिष्ट असायचे.
या मांडलिक राजांमध्ये लढाया व्हायच्या आणि प्रदेश जिंकले जायचे. वतनदार बदलले जायचे किंवा वतनदार रात्रीतून निष्ठा बदलायचे. या सगळ्या हाणामारीत रयत कुठेही हिशोबात नव्हती. हि अवस्था मुघल आक्रमक येण्यापूर्वी होती आणि नंतरही होती. मुघल आक्रमक शूर होते आणि इथले राजे बुळे होते असला काही प्रकार होता का ? तर तस काही नव्हतं. पण इथले राजे रजवाडे, सुभेदार, वतनदार, जहागीरदार एकाच हिंदू धर्माचे असूनही आपसात लढाया करीत होते, एकमेकांच्या जीवावर उठत होते. आपली छोटीशी राज्यसत्ता टिकवण्यासाठी या सरदार, वतनदार, सुभेदार मंडळीनी मुघल आक्रमकांची साथ केली म्हणून मोगलांना भारतात बस्तान बसवता आले.
त्यावेळी इथल्या सत्ताकारणात धर्म महत्वाचा असेलही मात्र त्यापेक्षा राज्यविस्ताराच्या लालसा जास्त मोठ्या होत्या. अकबराच्या दरबारातील नवरत्ने कोणत्या धर्माची होती हे तपासलं तरी सारं कळत. अकबराचा सेनापती राजा मानसिंग आणि राणा प्रतापाचा सेनापती हाकिमखान सुरी ही उदाहरण बोलकी आहेत. खुद्द शिवाजी राजांचे आईकडील आणि वडिलांकडील नातेवाईक याला अपवाद नव्हते. शहाजी राजांची पुण्याची जहागीर उध्वस्त करून पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवून वेशीत पहार रोवून चप्पल टांगणारा हिंदू सरदार मुरार जगदेव आणि शहाजी राजांना अटक करण्यात अफजलखानाला मदत करणारे मुधोळकर घोरपडे हि उदाहरणही त्यावेळची वस्तुस्थिती दर्शवतात. हे निष्ठा बदलणारे स्थानिक सुभेदार, सरदार, वतनदार सगळीकडे नोकऱ्या करायचे. कधी मुघल, कधी आदिलशाही, कधी निजामशाही तर कधी अजून कुठलीतरी शाही. भारतीयांनी मुघलांच्या पायाशी निष्ठा वाहिल्या त्या तीन प्रकारे.. जे उच्चवर्णीय सुभेदार, सरदार, वतनदार होते त्यांनी नोकऱ्या पत्करल्या, जातउतरंडी मध्ये खालच्या स्तरावर असणाऱ्या लोकांनी सामाजिक सन्मान आणि आर्थिक स्थैर्य मिळाव म्हणून धर्म बदलून मुसलमान झाले आणि राजपुतांनी तर थेट मुघल राजघराण्यात सोयरिकी केल्या.
नरहर कुरुंदकर म्हणतात त्याप्रमाणे “एत्तदेशियांचे राज्य व्हावे“ हि इच्छा जेव्हा शिवाजी राजांच्या मनात आली त्यावेळी त्यांना अपेक्षित असणारे राज्य रयतेच होत. जिथे रयतेला तोशीस लागू न देता राज्यकारभार केला जाईल. लुटालूट, जाळपोळ या गोष्टीपासून आपल्या रयतेला संरक्षण मिळेल. शिवाजी महाराज्यांच्या राज्यकारभाराचा मूळ उद्देश तोच होता म्हणून त्यांनी दुष्काळात सारा माफी देऊन औजारे, बियाणे कर्जाऊ दिली, सैन्याला वतनदारी किंवा लुटीचा हिस्सा देण्याऐवजी पगाराची पद्धत सुरु केली, लुटीचा ऐवज सरकारी खजिन्यात जमा करण्याची सक्ती केली. “भाजीच्या देठाला हात लावू नये“ किंवा “आरमाराला लाकूड घेताना पैसे देऊन जुने वठलेले झाड घ्यावे, बळजोरी करू नये“ हि आज्ञापत्रे नेमक हेच सांगतात.
सभोवती असणारे बहुसंख्य वतनदार हिंदूच असताना केंद्रीय सत्ता कुणाचीही असती तरीही शिवाजी राजे फक्त वतनदार राहिले असते. मग त्यांना या इतर वतनदारांचा, सुभेदारांचा जाच सहन करावाच लागला असता. हे ओळखूनच शिवाजी राजांनी मावळे जमवून, आपली लष्करी ताकद वाढवून, रयतेच्या हिताचे निर्णय घेऊन राज्यविस्तार केला म्हणून रयत त्यांच्या पाठीशी उभी राहिली.
शिवाजी महाराजांनी विस्तारलेल्या त्यांच्या स्वराज्यात प्रत्येकाला आपापला धर्म आचरणात आणण्याची मुभा होती. त्यामुळे केंद्रीय सत्ता कुठलीही असली तरीही रयतेच राज्य उभ करण्याची प्रेरणा मुळात धर्मातीत (म्हणजे आजच्या भाषेत धर्मनिरपेक्ष) असल्याने रयतेला फारसा फरक पडला नाही व सर्व रयतेने एकजुटीने शिवाजीला साथ केली.
बाकीचे राजे व त्यांची राज्यसत्ता संपत्ती मिळवून एशोआरामात राहण्यासाठी व महाल, स्मारकं उभारण्यासाठी आपल्याच लोकांना लुटत होती. त्याचवेळी शिवाजीराजांचे स्वराज्य इथल्या लोकांना स्थैर्य, संरक्षण, सुबत्ता, कायद्याच राज्य द्यायला तत्पर होतं हा मुलभूत फरक लक्षात घेतला तर या स्वराज्य प्रेरणा धर्मातीत होत्या हेही लक्षात येईल.
त्याकाळी फक्त उच्च वर्णीय समाज शिक्षित होता, त्यामुळे इतिहास त्यांनीच लिहिला. त्या इतिहासकारांनी नेमका हाच खरा इतिहास दडवून ठेवला आणि केवळ मुस्लिम राजवटी विरोधात शिवाजी राजे लढत होते एवढेच लोकांच्या मनावर बिंबवण्याचे काम केले. केंद्रीय सत्ता मुस्लिमांची होती हे सत्य आहे पण त्यांच्या राज्यातील सारे मांडलिक राजे, सुभेदार, सरदार, वतनदार, जहागीरदार, दरबारातले मुनीम आणि वकील हे जास्त संख्येने हिंदूच होते याचा सोयीस्कर विसर त्या इतिहासकारांना पडलेला दिसतो. इतिहासाचा चुकीचा संदर्भ घेऊन सध्या मुस्लिम विरोधक शिवाजी जनमनात रुजवण्याचे सत्र जोरात सुरु आहे.
जाणकारांनी खरा इतिहास समोर आणून लोकांना शहाणे करायला हवे, अन्यथा पुढची पिढी फक्त धर्मांध होईल व आपली प्रगती, विकास, आर्थिक परिवर्तन विसरून जाईल. आपसात लढण्यात बहुजनांची शक्ती खर्च होईल, खोट्या प्रतिष्ठेत सामान्य जनता गुंतून पडेल आणि पुन्हा आपण परावलंबी होऊ. सध्याच्या युगात या खोट्या प्रतिष्ठानां काहीही अर्थ नाही. आज जग सर्वांसाठी खुले झाले आहे. कोणीही, कोणत्याही देशात जाऊन शिक्षण घेत आहे, नोकरी, व्यवसाय करीत आहे. आखातातील मुस्लिम बहुल राष्ट्रात भारतीय वंशाचे लोक पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले आहेत. अमेरिकेची व्हाइस प्रेसिडेंट भारतीय वंशाची हिंदू महिला आहे. इंग्लंड मधील एका शहराचे महापौर महाराष्ट्रीयन होते आणि लंडनच्या महानगर पाहिलेत मुस्लिम, चीनी-जपानी वंशाचे बौद्ध, हिंदू, पारशी, अरबी नगरसेवक आहेत. अनेक देशांचे राजदूत, वरिष्ठ अधिकारी भारतीय वंशाचे हिंदू आहेत. जगातल्या या भारतीयांमध्ये ऐंशी टक्के (80%) लोक ब्राम्हण समाजाचे व वीस टक्के इतर सर्व जातींचे मिळून आहेत. यात आपण कोठे आहोत याचा विचार करण्याची हीच वेळ आहे.
मित्रांनो, जग बदलत आहे. या परिवर्तनात आपणही सामील होऊया अन्यथा आपली पुढची पिढी धर्मांध होऊन गरिबीत खितपत पडेल याचे भान असुद्या. जागते रहा, सर्वांना जागे करा. आपसात लढवणाऱ्या आणि प्रगती खुंटवणाऱ्या भावनिक इतिहासात रमण्यापेक्षा शिवबांची प्रेरणा घेऊन, आपले आजचे प्रश्न समजून घेऊन विकासाच्या वाटा शोधणारा नवा इतिहास निर्माण करा.
संकलन व लेखन : राजेंद्र शेलार, सातारा[email protected]