जिल्हा रुग्णालयातून करोना अनुमानित व्यक्ती पळाली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १९ : सातारा जिल्ह्यातील एका तालुक्यातून  करोना अनुमानित व्यक्तीला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तो व्यक्ती दि. 6 जुलै रोजी रुग्णालयातून पळाला असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली. याबाबत जिल्हा रुग्णालयातील एका ज्येष्ठ वैद्यकीय अधिकार्‍याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, याबाबतची जुजबी माहिती जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीला देत ही घटना दाबण्याचा प्रयत्न रुग्णालयातील प्रशासनाने केल्याचे पुढे येत आहे. रुग्णालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पलायन केलेल्या त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता जिल्हा रुग्णालयात गैरकारभाराचे पेव फुटले असल्याचे स्पष्ट होत आहे.

याबाबत रुग्णालयीन सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की सातारा जिल्ह्यातील एका सधन तालुक्यातील एका ज्येष्ठ व्यक्तीमध्ये  करोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांना तेथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक 2 मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू केले होते. उपचार सुरू असताना दि. 6 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या दरम्यान ती व्यक्ती रुग्णालयातून पळून गेली. याबाबतची माहिती समजतात वार्डमध्ये कार्यरत असणार्‍या नर्सने या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. दरम्यान त्या नर्सने जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत संबंधित व्यक्तीचे नाव आणि ती व्यक्ती दि. 6 जुलै रोजी 12.30 पासून त्याच्या वार्डमधील बेडवर दिसून येत नसल्याचे त्यात म्हटले आहे. संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव आणि पत्ता न दिल्यामुळे रुग्णालयातील पोलिसांनी याबाबतची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. नर्सने तक्रार दिली नसल्याने पोलिसांनी त्याची फक्त नोंद घेतली. जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने संबंधित व्यक्ती रुग्णालयातून पळून गेल्याची वाच्यता होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. आज 12 दिवस झाल्यानंतर या पलायन प्रकारावर प्रकाशझोत पडला असून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.

वार्ड क्रमांक 2 मधील पळून गेलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना त्यात तालुक्यामध्ये क्वारन्टाईन केले आहे. त्यापैकी एकाने आज जिल्हा रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकार्‍याला फोन करून आमच्या कुटुंबातील व्यक्ती अद्याप घरी आला नसल्याची कळवल्यानंतर या पलायनाचे बिंग फुटले. तद्नंतर लगेचच आज जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी दि. 6 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणार्‍या पोलिसांना पाचारण केले. यावेळी झालेल्या चर्चेत नर्सने पळून गेलेल्या व्यक्तीचे संपूर्ण नाव व पत्ता दिला नाही. त्यामुळे नर्सने दिलेल्या पत्राची पोलिसांनी फक्त नोंद घेतली आहे, असे स्पष्टीकरण केले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

जिल्हा रुग्णालयातून रुग्णांनी पळून जाण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक वेळा रुग्ण पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र दि. 6 रोजी पळून गेलेली व्यक्ती हा कोरोना अनुमानित होती. तद्नंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची चर्चा रुग्णालयात झडत असल्यामुळे या घटनेतील गांभीर्य लक्षात येते. आज बारा दिवस झाले. पळून गेलेली व्यक्ती किती जणांच्या संपर्कात आला असेल? त्याने किती जणांना कोरोनाचा प्रसाद दिला असेल याची कल्पना न केलेलीच बरी.

जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षाच्या एका वैद्यकीय अधिकार्‍याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता आम्हाला जेवढी माहिती मिळाली होती तेवढी माहिती आम्ही जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत दिली होती. त्याबाबतचे पत्र आमच्याकडे असून पोलिसांनी लगेचच तपास करायला हवा होता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्यामुळे भविष्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यात शीतयुद्ध घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!