स्थैर्य, वाई, दि.७: मांढरदेव येथील यात्रा करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी रद्द करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यातील २७, २८ व २९ रोजी पौष पौर्णिमेला देवीची मुख्य यात्रा आहे. दरम्यान १३ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत दर्शनासाठी मंदिरही बंद राहणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेश व निर्देशांनुसार यात्रेतील धार्मिक विधी, पूजाअर्चा रुढी परंपरेनुसार स्थानिक पातळीवरील देवस्थानचे ट्रस्टी, मंदिर पुजारी व ग्रामस्थ अशा मोजक्याच भाविकांनी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी संगीता राजापूरकर -चौगुले यांनी दिल्या आहेत.
मांढरदेव येथील काळुबाई ही महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जानेवारी महिन्यात पौष पौर्णिमेला देवीची यात्रा भरते. २७, २८ व २९ रोजी देवीची मुख्य यात्रा आहे. मात्र महिनाभर देवीचा यात्रोत्सव चालतो. या कालावधीत मांढरगडावर सुमारे सात ते आठ लाख भाविक येत असतात.
करोनामुळे यात्रा, जत्रांसह गर्दी होणारे सार्वजनिक उत्सव रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी तो पूर्णपणे थांबलेला नाही. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यातील यात्रा, जत्रांसाठी प्रशासनाकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. मांढरगडावर यात्रा कालावधीत मोठ्या संख्येने भाविक येणार ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने बैठक घेऊन यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
यात्रेसंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीस तहसीलदार रणजीत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल खराडे, गटविकास अधिकारी उदय कुसुरकर, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे,देवस्थानचे सचिव रामदास खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्यातील बहुतांश यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने मांढरदेव येथील यात्रा रद्द करण्याबाबत पूर्व नियोजन बैठक घेऊन मंदिर पुजारी, स्टाँलधारक व मांढरदेव ग्रामस्थ, देवस्थानचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
दि. १३ जानेवारी ते १३ फेब्रुवारी हा संपूर्ण पौष महिना दर्शनासाठी मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत जाहीर करण्यात आला. दरवर्षी यात्रेसाठी बाहेरगावाहून येणारे व्यावसायिक मांढरदेव गावात येणार नाहीत व मांढरदेवसह परिसरातील यात्रा निमित्ताने पै – पाहुण्यांना बोलावू नये याही दृष्टीने दुकानदार व परिसरातील सर्व गावातील ग्रामस्थांनी व मांढरदेव ग्रामस्थांनी काळजी घ्यावयाची आहे, अशा सूचना यावेळी प्रांताधिकारी यांच्यामार्फत देण्यात आल्या. बैठकीला मांढरदेव येथील तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.