कोरोना – १९ प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आवाहन


स्थैर्य, मुंबई, दि. ०८: कोविड-१९ चा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. लातूर शहर आणि तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सक्रिय होऊन लोकांमध्ये जागृती करावी, मृत्यूदर कमी राखण्यासाठी रूग्णांचा शोध घेऊन त्यांना वेळेत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी मंत्रालयातून लातूर शहर विधानसभा मतदारसंघ तसेच तालुक्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, सदस्य यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोरोना प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्याच्या तसेच रूग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्याच्या कामी सक्रिय होण्याचे आवाहन केले.

प्रारंभी या बैठकीत सहभागी झालेल्या सर्वांच्या सूचना व म्हणणे पालकमंत्री देशमुख यांनी ऐकून घेतले. कोरोना प्रादूर्भावाच्या संदर्भाने करण्यात येत असलेली जनजागृती, उपचारासाठी करण्यात उभारण्यात आलेल्या सोयीसुवीधा, औषधे व तंत्रज्ञानाची उपलब्धता या संबंधाने उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने शंकासमाधान केले.

टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन उठेल

कोरोना प्रादूर्भाव आटोक्यात आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊन संदर्भाने बैठकी दरम्यान उपस्थित झालेल्या मुद्यावर पालकमंत्री देशमुख म्हणाले की, देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाचा वेग सर्वांधिक आहे. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा अपरिहार्य निर्णय घ्यावा लागला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यापारी संघटनाच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे. एकुण परिस्थितीचे गांभिर्य त्यांना समजावुन सांगितले आहे. सर्वतोपरी उपाययोजना आयोजिल्या आहेत त्यामुळे कोरोना प्रादूर्भाव लवकरच आटोक्यात येईल असा विश्वास आहे. यामुळे टप्या-टप्याने हा लॉकउाऊन उठविण्यात येणार आहे ही बाब लातूरातही पदाधिकारी यांनी व्यापारी बांधवांना समजावून सांगावी असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.

गरज पडल्यास जम्बो कोविड केअर सेंटर उभारू

लातूर शहर व परिसरातील रूग्णांवर उपचार करण्यासाठी विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्था तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उभारल्या आहेत, उभारण्यात येत आहेत. सुपरस्पेशालिटी रूग्णालयात 5 वॉर्ड आणि वैद्यकीय महाविद्यालयात 1 अतिदक्षता वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. महापालिकेचे 4 कोविड केअर सेंटर सुरू झाले असून आणखी 1 कोविड सेंटर सुरू होत आहे. याशिवाय आरोग्य विभागाचे समाज कल्याण वसतीगृह येथे कोविड केअर सेंटर सुरू आहे. या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळत आहेत असे सांगून गरज पडल्यास शहरात आणखी  जम्बो कोविड केअर सेंटर सुरू केले जाईल असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध

रेमडेसिवीरसारख्या औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्यांची दखल घेऊन लातूरसाठी पुरेसा प्रमाणात हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागानेही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सद्या त्याचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध करून दिला आहे. या औषधाचा अनावश्यक वापर होवून टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यास जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे प्रशासनानेही दक्षता घेतली आहे असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

ज्येष्ठ मंडळींना घरी जाऊन लस देण्याच्या पर्यायाचा विचार

सध्या महाराष्ट्रात आणि देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. जागतिक स्तरावर काही देशात तिसरी लाट आली आहे. त्यामुळे आपण आत्ताच अधिक सजग होणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यांचे नियोजन प्रशासकीय पातळीवर होत असून पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या मोहिमेला गती देण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. लातूर जिल्ह्यात पुरेशी लस उपलब्ध होईल शिवाय ज्येष्ठ मंडळींना घरी जाऊन लस देण्याचा पर्याय देता येईल का यांचाही विचार सुरू असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत आहे त्याच पध्दतीचे काम शहारात व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले यांनी शहरात लसीकरणाला गती देण्यात आली असून त्यासाठी लसीकरणाच्या केंद्रांची संख्या 21 पर्यंत वाढविण्यात आली आहे. रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे उपचारासाठी रूग्णालये व बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे असे  श्रीशैल उटगे यांनी यावेळी सांगितले. ॲड. किरण जाधव यांनी शहरातील लॉकडाऊन व्यापारी, ग्राहक यांच्या अडचणी, औषधे व प्रयोगशाळेतील वाढते दर, रूग्णालयातील बेडची उपलब्धतता याबाबत आढावा सादर केला. महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिपक सुळ यांनी होम ऑयसोलेशन रूग्णांना घरपोच सुविधा मिळण्याच्या दृष्टीने काही सुधारणा सुचविल्या. घरपोच तपासणी पथके पाठविणे, रूग्णांना रूग्णालयात पोहोचविण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे असे  स्मिता खानापूरे सांगितले, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललीतभाई शहा यांनी मार्केटमध्ये शेतीमालाची खरेदीविक्री नियम पाळून करण्यात येत असल्याची माहिती दिली.

बैठकीस पंचायत समिती सभापती सौ. सरस्वती प्रताप पाटील व उपसभापती प्रकाश ऊफाडे, नियोजन समिती संचालक समद पटेल, नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, रवीशंकर जाधव, सचिन बंडापल्ले, अहमदखॉ पठाण, गौरव काथवटे आदी सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!