
थेट WhatsApp वर मिळवा
सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जवाटप व वसुलीचे निकष कठोर करत कर्जाची मर्यादा १०० कोटी रुपये आणि साखर व इथेनॉल विक्रीवर शासनाचे नियंत्रण लागू करण्यात आले आहे.
स्थैर्य,सातारा, दि. २७ नोव्हेंबर : सहकारी साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत राज्य सरकारने आर्थिक निकष अधिक कठोर केले असून, कर्जासाठी १०० कोटी रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. सहकार विभागाने शुद्धिपत्रक काढून राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) मिळणाऱ्या कर्जाच्या धोरणातील अटी व शर्तींमध्ये सुधारणा केली आहे. वाढती थकबाकी आणि सरकारी निधीवर येणारा अतिरिक्त ताण टाळण्यासाठी कर्जवाटपापासून वसुलीपर्यंत कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.
कर्जाची मर्यादा आणि कठोर आर्थिक निकष
नव्या निकषांनुसार, प्रत्येक सहकारी साखर कारखान्याला पात्र ठरलेली कर्जरक्कम किंवा १०० कोटी रुपये यापैकी कमी असलेली रक्कमच कर्जाच्या स्वरूपात मिळू शकेल. कारखान्याचे स्थिर मालमत्ता आणि कर्ज प्रमाण किमान १:१.५, तर कर्ज परतफेड क्षमतेचे प्रमाण किमान १.३३ पट असणे बंधनकारक आहे. तसेच कारखान्याचा संचित तोटा ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक नसावा आणि संभाव्य परतफेडीची आकडेवारी मागील तीन वर्षांच्या आर्थिक कामगिरीशी सुसंगत असावी.
साखर विक्रीतील वसुली आणि प्रकल्पांवर निर्बंध
कर्जाच्या परतफेडीसाठी साखर विक्रीतून किमान २५० रुपये प्रति क्विंटल किंवा इथेनॉल विक्रीतून ठरावीक रक्कम संयुक्त खात्यात वळती करणे आवश्यक असून, कपात प्रमाणित झाल्यानंतरच गेटपास दिला जाईल. कर्ज पूर्ण फेडल्याशिवाय शासन व एनसीडीसीच्या पूर्वपरवानगीशिवाय नवीन प्रकल्प उभारता येणार नाहीत किंवा स्थिर मालमत्तेत गुंतवणूक करता येणार नाही. प्रत्येक कारखान्यावर विशेष लेखापरीक्षक नियुक्त केला जाणार असून, अटींचे उल्लंघन झाल्यास संपूर्ण रक्कम वसूल करण्याचे अधिकार शासनाने राखून ठेवले आहेत.



