दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । भारतीय राष्ट्र निर्मितीमध्ये व स्वातंत्र्य चळवळीमध्ये मुस्लिम समाजाचे योगदान अतिशय मोलाचे आहे. हा इतिहास तरुण पिढी पुढे आणणे हे प्रत्येक सजक नागरिकाचे काम आहे असे प्रतिपादन इतिहासाचे जेष्ठ अभ्यासक सरफराज अहमद ( सोलापूर) यांनी सातारा येथे बोलताना व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सातारा शहरातील गुरुवार परज येथील नगरपालिकेच्या शाळेच्या हॉलमध्ये “भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील मुस्लिम समाजाचे योगदान ” या विषयावरती सरफराज अहमद यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. तसेच याचवेळी सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय मांडके यांचेही सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयावर भाषण झाले. मुस्लिम जागृती अभियान व परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अमीर खुसरो यांनी भारत देशाबद्दल लिहिलेले गीत हे भारतीय राष्ट्रगीता सारखेच प्रेरणादायक आहे. पहिला मुघल सम्राट हा केवळ प्रशासक नव्हता तर अतिशय विद्वानही होता. त्यांनी लिहिलेल्या आठ मसणावी उपलब्ध आहेत त्यापैकी एक मसणावी म्हणजेच महाकाव्य भारतीय शेतीच्या संदर्भात आहे. तसेच जैऊद्दीन भरणी या अर्थशास्त्रज्ञाने “:तारीख के फिरोजशाही ” या ग्रंथात एकल कर पद्धती अर्थात आताच्या जीएसटी बद्दल लिहिलेले आहे असे सांगतच सरफराज अहमद यांनी सोलापूरच्या हुतात्मा कुर्बान यांच्या कर्तुत्वाचा प्रेरणादायी इतिहास उपस्थितांना सांगितला. कुर्बान हुसेन यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जनजागृतीसाठी गजनफर नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते. १८५७ च्या लढाईत दिल्लीमध्ये फासावर लटकवलेले असंख्य मौलवी , बहादूरशाह जफर , अश्फाक उल्लाह खान , मौलाना हसरत मोहानी , सय्यद मोहम्मद शरफ्फुद्दिन कादरी , मौलाना शौकत अली, अरुणा असफ अली , हाजरा बेगम , अबिदा बानो बेगम , इनायत उल्ला खान , हैदर अली अशा असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीला सरफराज अहमद यांनी उजाळा दिला आणि हे योगदान समाजासमोर आणण्याची गरज व्यक्त केली.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सातारा जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनीही अनेक प्रकारे योगदान दिलेले आहे याचा अनेक उदाहरणे देऊन विजय मांडके यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. त्याचबरोबर त्यांनी आझाद हिंद सेना , भूमिगत स्वातंत्र्यसैनिक , सविनय सत्याग्रह करणारे स्वातंत्र्यसैनिक आणि प्रतिसरकार मध्ये काम करणारे स्वातंत्र्यसैनिक या यामध्ये असलेल्या मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाबद्दल माहिती सांगितली. प्रति सरकारच्या कासेगाव गटाचे उपगटप्रमुख असलेले कॉ शेख काका यांच्या कार्याची माहिती देताना त्यांनी प्रतिसरकारच्या स्वतंत्र भारत या पत्रिकेचे ते संपादक असल्याचे सांगितले. वडूजच्या 9 सप्टेंबर 1942 च्या मोर्चात अनेक मुस्लिम बांधव सहभागी झाले होते हे त्यांनी आवर्जून सांगितले. अनेकांना कारावास भोगावा लागला होता आणि अनेक मुस्लिम बांधव स्वातंत्र्य चळवळीत शहीद झाले याचाही उल्लेख त्यांनी केला. स्वातंत्र्य चळवळीत सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे योगदान अतिशय महत्त्वाचे असेच आहे असे विजय मांडके यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मिनाज सय्यद यांनी केले.
या कार्यक्रमासाठी डॉ दत्तप्रसाद दाभोळकर ,डॉ. प्रसन्न दाभोळकर प्राचार्य डॉ. आतार , कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य शेख , किशोर बेडकीहाळ , जयंत उथळे , डॉ तांबोळी , एडवोकेट मिलिंद पवार , दिलीप ससाणे , नंदकुमार चोरगे , गौतम भोसले , शाहीर प्रकाश फरांदे तसेच मुस्लिम जागृती अभियान चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरेगाव रहिमतपूर , वडूज अशा आसपासच्या परिसरातील तरुणांनी ही मोठी उपस्थिती दर्शवली होती. मुस्लिम समाजाविषयीचे गैरसमज दूर होण्यास व परस्पर सामंजस्य आणि विश्वास वाढवण्यास अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी मदत होईल असा विश्वास यावेळी अनेकांनी व्यक्त केला.