रस्त्यांच्या निर्मितीमुळे ग्रामीण भागात विकासाला चालना – पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२० मार्च २०२२ । अमरावती । नागरी सुविधेअंतर्गत रस्त्यांची निर्मिती, रस्त्यांचे कॉक्रीटीकरण व रस्त्यावरील सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने रस्त्यांचे बळकटीकरण अत्यंत महत्वाची बाब आहे. नागरी सुविधांच्या निर्मितीची दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करून ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल, असा विश्वास जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

आज भातकुली, अंजनगाव, दर्यापूर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या बांधकामाचे  भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

भातकुली तालुक्यातील चिचखेड पोचमार्ग, उमरापूर ते निरुळ फाटा रस्त्याच्या कामाचे 25 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यामुळे नागरिकांसाठी सुविधा निर्माण होणार असल्याचे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत  येथील रामा वातोंडा ते हिमतपुर मार्कि रस्त्याचे  बांधकाम 3 कोटी 3 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले. यावेळी सरपंच गजेंद्र काळमेघ,उपसरपंच वर्षा गडलिंग,सदस्य रामकृष्ण टाले आदी उपस्थित होते

पूर्ण नदीवरील पुल निर्मितीचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश

भातकुली तालुक्यातील निरुळ गंगामाई ते मीर्चापुर रस्त्यावरील 13 कोटी 9 लक्ष रुपयांच्या निधीतून पुरणा नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलामुळे दळणवळणाची सुविधा निर्माण होणार असून औद्योगिकदृष्ट्या हा पूल अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. पूल निर्मितीचे काम गतीने करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी यावेळी संबंधितांना दिले.

आमदार बळवंत वानखेडे, निरुळ गंगामाईच्या सरपंच अर्चना खांनदे, जिल्हा परिषदेचे सदस्य हरिभाऊ मोहोड, कार्यकारी अभियंता अरुंधती शर्मा उपअभियंता संदीप देशमुख आदी उपस्थित होते.

सासन (बु.) व सासन (रामपुर) दत्तक घेऊन  मूलभूत सुविधांची निर्मिती करणार

दर्यापूर तालुक्यातील सासन बु. अडुळा बाजार ते म्हैसपूर येथील रस्ता बांधकामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर केले. सासन गावात नागरिकांसाठी मूलभूत सुविधांची निर्मिती करून विकास करण्यासाठी सासन बु. आणि सासन (रामपूर) ही दोनीही गावे दत्तक घेणार असल्याचे श्रीमती ठाकूर यांनी उपस्थितांना सांगितले. नागरी सुविधांच्या निर्मितीसाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.

दर्यापूरअंजनगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

येवदा-घोडचंदी ते अडुळा रस्त्याच्या 4 कोटी 6 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या बांधकामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले.

अंजनगाव तालुक्यातील मुऱ्हा, वरूडा, चिंचोली-कुंभारगाव- उमरी रस्त्याच्या 4 कोटी 98  लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या बांधकामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले.

येथील कसबे गव्हाण-कापूसतळना रस्त्यावरील पुलाच्या 4 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या बांधकामाचे भूमिपूजन केले.

मुऱ्हा येथील सातेगाव- वडुरा ते मुऱ्हा देवी रस्त्यावरील 2 कोटी 68 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य वंदना करुले, पूजा हाडोळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!