कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता खरा वारकरी तुकाराम बीजेला देहुला जाणार नाही; विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रतिपादन


स्थैर्य, सातारा, दि. २८: वारकरी संप्रदायात मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परंपरा आहे असं कोण म्हणालं ? महामारीच्या काळात गर्दी करुन , जमाव जमवुन मृत्यूस कारण बनवून हजारो वारकरयांच्या जिवाशी खेळा अशी वारकरी संप्रदाय अथवा वारकरी संतांची शिकवणूकच नाही. म्हणुन कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता खरा वारकरी देहुला तुकाराम बीजेला जाणार नाही. वारकरी हा प्रथम भारताचा नागरिक आहे. म्हणुन तर नैतिकतेबरोबर कायद्याचे पालन करणारा तो आहे म्हणुनच देहुला जायचा अट्टाहास खरा वारकरी करणार नाही असे प्रतिपादन करणारे पत्रक गुरुवर्य भोजलींग महाराज यांचे वंशज व किर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर , विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष व बडवे उत्पात हटाव पुस्तिकेचे लेखक कॉ धनाजी गुरव आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र चे उपाध्यक्ष व वारी समतेची लेखक विजय मांडके यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर , कॉ धनाजी गुरव व विजय मांडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले पुढे आहे की कोरोना व्हायरसचे विषाणू सर्वत्र पसरु लागले आहेत. जगद्गुरु तुकोबाराय तर म्हणतात “तुका म्हणे अन्न जिरो नेदी माशी, आपुलिया जैसी संसर्गे” जगद्गुरू तुकोबाराय संसर्गाच्या बाबतीत एवढी समाजाची काळजी घेत त्यांना प्रबोधित करतात तर मग त्यांच्या विचारांची पायमल्ली करीत त्यांच्या विचार वाहकांनी देहू ला जाण्याचा अट्टाहास का बरे करावा ? शेवटी शरीर हे एक परमार्थाचे साधन आहे त्याला दुःख न देता आरोग्य सांभाळत परमार्थ करणेच हिताचे आहे असे तुकोबारायांना वाटते म्हणूनच जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात “तुका म्हणे आम्हा, एकांताचा वास, ब्रम्ही ब्रम्हरस सेलू सदा”

विज्ञानवादी दृष्टी असलेली समाजरचना निर्माण करण्यासाठीच खरा वारकरी संप्रदाय कार्यरत राहत आहे विज्ञानच सांगते ठराविक काळ आपण या विषाणूंचा पासून लांब राहिलात तर ते नष्ट होतात आणि त्याचा प्रादुर्भाव होत नाही.

या सर्व बाबींचा आपण गांभीर्याने विचार करावा व एकांतवास स्वीकारावा हेच आपल्या फायद्याचे आहे. महामारीच्या काळात गर्दी करून जमाव जमवून मृत्यूस कारण बनवून हजारो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळा अशी वारकरी संप्रदाय अथवा वारकरी संतांची शिकवणुकच नाही असेही ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर , कॉ धनाजी गुरव व विजय मांडके यांनी म्हटलं आहे.


Back to top button
Don`t copy text!