दैनिक स्थैर्य | दि. ६ जून २०२३ | सातारा |
ओरिसा येथील बालासोर बहगाना स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक होऊन शेकडो प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांना श्रद्धांजली म्हणून सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस कमिटीत ‘कँडल मार्च’चे आयोजन करून श्रद्धांजली वाहिली तर जखमी प्रवासी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ओरिसा येथील बालासोर बहगाना स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. या घटनेस केंद्र सरकार जबाबदार आहे. या घटनेनंतर केंद्र सरकार लोकांची दिशाभूल करत आहे. नैतिकता म्हणून रेल्वेमंत्री यांनी राजीनामा द्यावा. या घटनेमुळे गरिबांची रेल्वे सुरक्षित आहे का? असा प्रश्न उभा राहत आहे. रेल्वेमंत्री यांनी तीन महिन्यांपूर्वी एक ‘रेल्वे कवच’ आणले, अशी घोषणा केली होती. या घटनेमुळे तो दावा फेल गेला आहे. केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी भरडला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, सरचिटणीस नरेश देसाई, सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, सर्जेराव पाटील, अन्वर पाशाखान, जयवंत कुंभार, धनश्री महाडिक, रजनी पवार, सुषमा राजेघोरपडे, मनिषा पाटील, रजिया शेख, मनीषा पाटील, बाळासाहेब शिरसाट, मनोज तपासे आदी उपस्थित होते.