फलटण शहर व तालुकयातील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या निवडी जाहीर
स्थैर्य, फलटण, दि. १६ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला खूप मोठी परंपरा असून आजपर्यंतच्या प्रवासामध्ये काँग्रेस पक्षाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये देशातील काँग्रेसबरोबरच राज्यातील व जिल्ह्यातील काँग्रेस सुद्धा काही प्रमाणात दुबळी झालेली आपणास पाहावयाला मिळाली. आता मात्र सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभारी घेऊ पाहत आहे. त्यामुळेच आगामी काळात फलटण शहरात व तालुक्यात होणार्या सर्व निवडणुका राष्ट्रीय काँग्रेस संपुर्ण ताकतीने लढवणार असुन राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संपुर्ण ताकद देणार आहे, अशी ग्वाही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा समन्वयक महेंद्र सुर्यवंशी – बेडके यांनी दिली.
अनेक वर्ष काँग्रेस पासून दुरावलेले सातारा जिल्ह्यातील एक दिग्गज नेते तथा माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्यासह त्यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य उदयसिंह पाटील काँग्रेसमध्ये सक्रिय झालेले आहेत. त्यांच्या नंतर खटाव तालुक्याचे युवा नेते तथा हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनीही स्वगृही म्हणजेच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. फलटण तालुक्यात पुर्वी काँग्रेसचे नेतृत्व करणारे व विद्यमान भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशनंतर फलटण तालुक्यात काँग्रेस कुठे नावाला देखील शिल्लक राहिलेली नव्हती. परंतु फलटण नगर परिषदेचे नगरसेवक सचिन बेडके व महेंद्र बेडके यांच्या पुढाकारातून फलटणची काँग्रेस उभारी घेऊ पाहत आहे. याचाच एक भाग म्हणून फलटण तालुक्यातील व शहरातील काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलच्या निवडीचा कार्यक्रम आज सातारा येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी जाहीर केल्या आहेत.
अल्पसंख्याक सेलच्या फलटण तालुका अध्यक्षपदी ताजुउदीन महम्मद बागवान, फलटण तालुका उपाध्यक्षपदी इकबाल उर्फ बालमभाई गफुर शेख, फलटण शहर अध्यक्षपदी अलताब कादरभाई पठाण यांची तर दीपक शिंदे यांची फलटण शहर ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी व ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी रामभाऊ शेंडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सचिन बेडके, महेंद्र बेडके, पंकज पवार, सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केलेले आहे.