स्थैर्य, मुंबई, दि.२१: काँग्रेस अध्यक्षा सोनिया
गांधी यांनी दिल्लीत अलीकडेच पक्षातील नाराज नेत्यांसोबत बैठक घेऊन चर्चा
केली. त्यानंतर चार राज्यांतील पक्ष संघटनेतील फेरबदलांना सुरुवात झाली.
सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्र, तेलंगण, गुजरात आणि मध्य प्रदेश या चार
राज्यांमध्ये फेरबदल होणार आहेत. त्यात मुंबई अध्यक्ष बदलण्यात आले असले
तरी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पद मात्र शाबूत राहिले आहे.
गुजरातमध्ये
पोटनिवडणुकीत पक्षाच्या सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष
अमित चावडा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ
प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. हैदराबाद महानगरपालिका
निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत तेलंगणचे प्रदेशाध्यक्ष
उत्तमकुमार रेड्डी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब थोरात राज्य
विधिमंडळात पक्षाचे नेते तसेच महसूलमंत्री आहेत. त्याबरोबरच त्यांच्याकडे
प्रदेशाध्यक्षपदाचीही जबाबदारी आहे. त्यामुळे या फेरबदलात थोरात यांची
गच्छंती होणार, अशी अटकळ होती.
थोरात
यांच्या जागी राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील व मराठवाड्यातील ओबीसी
नेते राजीव सातव यांची वर्णी लागणार, अशी चर्चा पक्षात होती. मात्र,
पक्षश्रेष्ठींनी थोरात यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला. त्यांची गच्छंती तर
झाली नाहीच, उलट थोरात यांच्या नेतृत्वात मुंबई काँग्रेससाठी छाननी समिती
आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी समिती स्थापन
करण्यात आली आहे.