स्थैर्य, सातारा, दि.२६: केंद्र सरकारने लावलेल्या बेसुमार करामुळे पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे दर भडकले आहेत. मोदी सरकारच्या हिटलरशाहीमुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे, असा आरोप करत सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण जिल्हा व तालुका स्तरांवर उपोषण, आंदोलन करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी हटाव, देश बचाव, मागे घ्या… मागे घ्या…इंधन दरवाढ मागे घ्या, शेतकरी विरोधी केंद्रीय कायदे रद्द करा, मोदी सरकार हाय-हाय, काळे कायदे रद्द करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, ऍड. विजयराव कणसे, बाळासाहेब शिरसाट, नाना लोखंडे, धर्यशील सुपले, मनोज तपासे, ऍड. दत्तात्रय धनवडे, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, शहराध्यक्षा रजिया शेख, माधुरी जाधव, मालन परळकर आदी उपस्थित होत्या.
दरम्यान सातारा येथील संयुक्त कामगार शेतकरी संघर्ष समितीनेही या भारत बंदच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. समिती सदस्य शंकर पाटील, अस्लम तडसरकर, विक्रांत पवार, सलीम आतार, परवेज सय्यद यांनी करोना प्रतिबंध उपाययोजना परिणाम व फलश्रुती याचा जिल्हास्तरिय अहवाल सादर करण्याची मागणी केली होती. याशिवाय किसान मोर्चाच्या भारत बंदला त्यांनी पाठिंबा दिला.