स्थैर्य, सातारा, दि.२२: सातारा तालुक्यातील बोरखळ येथे वाटेत ठेवण्यात आलेली ट्रॅक्टरची अवजारे काढण्यावरुन झालेल्या मारामारीप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबत विनोद अर्जून रसाळ (वय 35, रा. बोरखळ, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. 19 रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्या घराजवळील रस्त्यावर ट्रॅक्टरची अवजारे ठेवली होती. मात्र, जयश्री सुभाष रसाळ (वय 58), हणमंत सुभाष रसाळ (वय 23, दोघे रा. बोरखळ) यांनी विनोद यांना ’तुम्ही येण्या-जाण्याच्या वाटेत ठेवलेली ट्रॅक्टरची अवजारे उचला आम्हाला कडबा आणायचा आहे,’ असे सांगितले. मात्र, विनोद यांनी ’मी ट्रॅक्टरची अवजारे उचलणार नाही, मला ठेवायला जागा नाही,’ असे सांगितले. याचा राग आल्यामुळे जयश्री रसाळ यांनी विनोद यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ आणि दमदाटी केली. यावेळी हणमंत रसाळ याने विनोद यांच्या डोक्यात आणि उजव्या हातावर दगड फेकून मारला. यात विनोद जखमी झाले. याप्रकरणी त्यांनी शनिवार, दि. 20 रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर जयश्री आणि हणमंत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस नाईक देशमुख करत आहेत.
दरम्यान, जयश्री सुभाष रसाळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बोरखळ येथे बसस्थानकाशेजारी असलेल्या परड्यात वाटेत लावलेली ट्रॅक्टरची पलटी व रोटर काढून बाजूला लावा, असे कुसूम अर्जून रसाळ यांना जयश्री यांनी सांगितले. या कारणावरुन निलेश अर्जून रसाळ, विनोद अर्जून रसाळ, मेघा विनोद रसाळ, दिपाली अर्जून रसाळ, गणेश निलेश रसाळ (सर्व रा. बोरखळ, ता. सातारा) यांनी एकत्र येत जयश्री यांचा मुलगा हणमंत रसाळ यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. या भांडणात फिर्यादी जयश्री यांची कपडे फाटली आणि गळ्यातील मंगळसुत्र आणि फोन पडून गहाळ झाला. याप्रकरणी शनिवार, दि. 20 रोजी तक्रार दिल्यानंतर कुसूम रसाळ, निलेश रसाळ, विनोद रसाळ, मेघा रसाळ, दिपाली रसाळ, गणेश रसाळ या सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस नाईक राऊत करत आहेत.