स्थैर्य, मुंबई, दि. ०४ : कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांनी घराबाहेर फिरण्याबाबत काही अटी लागू केल्या होत्या. त्यातील घरापासून केवळ दोन किलोमीटर परिघातच प्रवासाची मुभा देणाऱ्या अटीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अखेर ही अट रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे.
राज्य सरकारनं अट रद्द करताना, लोकांना आवाहन केलंय की, कुठलीही खरेदी करायची असल्यास घराजवळच करावी. तसंच, मुंबई पोलिसांनाही अट रद्दबाबतची सूचना देण्यात आली आहे.
घराबाहेर दोन किमीच्या परिघातल्या संचाराबाबतच्या अटीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. राज्याचे गृहमंत्रीही यांनीही मुंबई पोलिसांच्या या अटीबद्दल आक्षेप नोंदवला, त्यानंतर मुंबई पोलिसांनी सुधारित आदेश जारी केला.
“प्रवासासाठी फक्त दोन किमी अंतराची अट घालण्याच्या आदेशावर प्रतिक्रिया उमटली होती. त्यामुळेच घराजवळ खरेदी करण्याचा पर्याय असावा, अशी सूचना मुंबई पोलिसांना करण्यात आली आहे. लोकांनीही घराजवळच खरेदीसाठी जावे,” असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.