जल जीवन अभियानाची प्रलंबित कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०५ एप्रिल २०२२ । पुणे । जल जीवन अभियान हे महत्वकांक्षी अभियान असून त्याअंतर्गत प्रलंबित कामे जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सामाजिक संस्था आदींचा समन्वय साधून  ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

पुणे जिल्हा परिषद येथे जल जीवन अभियान, स्वच्छ भारत अभियान(ग्रामीण), महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामाची सद्यस्थिती व अमंलबजावणीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीच्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे विशेष कार्य अधिकारी चंद्रकांत गजभिये, प्रकल्प संचालक अशोक पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्री. रहाणे, अधिक्षक अभियंता सुभाष भुजबळ, उप जिल्हाधिकारी डॉ. वनश्री लाभशेटवार, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद टोणपे, भारत शेंडगे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, जल जीवन अभियान, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण), महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंत्रालयीन स्तरावर पाठविण्यात आलेले प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्यात येतील. घर, शाळा, अंगणवाडीत प्रलंबित नळ जोडणी तातडीने करुन पाणी पुरवठा करा. जल जीवन अभियानांतर्गत गवंडी, प्लंबर, वीजतंत्री व फीटर या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत अंगणवाडी, शाळा येथे शौचालयाची कामे पूर्ण करावीत. हागणदारीमुक्त गाव, शोषखड्डे निर्मीती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय बांधकामाचे उद्ष्टिनिहाय कामे मार्गी लावण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे विकेंद्रीकरण करावे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत सुरु असेलेली कामे महिन्याअखेर पूर्ण करण्याची कार्यवाही करावी.

खासगी संस्थेला देण्यात आलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी त्यांना मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना देत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अनुभवाचा या कामासाठी वापर करण्याच्या सूचना दिल्या. अभियानाची अंमलबजावणी यशस्वीपणे होण्यासाठी सामाजिक संस्थेचा सहभाग घेत सर्वांच्या सहकार्याने अभियान यशस्वी करावे, असे आवाहन श्री. पाटील केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद यांनी जिल्ह्यात जल जीवन अभियान, स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा सादर केला. तसेच गोबरधन प्रकल्पासाठी खेड तालुक्यातील कडूस ग्रामपचांयतीची निवड करण्यात आली असून नियुक्त संस्थेकडून कामे येथील करुन घेण्यात येणार असून प्लास्टिक व्यवस्थापन पथकाकडून तालुकानिहाय अहवाल मागवून कामे सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मजीप्राचे अधिक्षक अभियंता श्री.भुजबळ यांनी मजीप्राअंतर्गत कामाची सद्यस्थिती व अमंलबजावणीबाबत माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!