स्थैर्य, सातारा, दि.६ : दिवाळीनंतर काही दिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण वाढले होते. मात्र, मागील आठवड्यापासून कोरोनाबाधित 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत सध्या मृत्यू व बाधितांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.
सप्टेंबर महिन्यात सातारा शहरासह जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास सुरवात झाली होती. दिवाळी सणाला नागरिकांनी काळजी घेऊन घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र, दिवाळीच्या काळात नियमांचे उल्लंघन करत नागरिक फिरताना दिसून आले. त्यामुळे दिवाळीनंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसली. जिल्हाभरात दरदिवशी दोनशेहून अधिक बाधित आढळत होते, तर, मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत होते. मात्र, मागील आठवड्यापासून बाधित रुग्ण व मृत्यूचे प्रमाण नियंत्रित येताना दिसत आहे. दरम्यान, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत बाधित रुग्ण अडीचशेहून अधिक आढळत होते, तर, मृत्यूचे प्रमाणही 15 ते 20 हून अधिक होते. त्यावेळी परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली होती. सद्य:स्थितीत क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचारार्थ रुग्ण 33 असून, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांतही कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे.