स्थैर्य, विसापूर, दि.७: मंगळवारी सकाळी आठपर्यंतच्या 24 तासांमध्ये खटाव तालुक्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या अवेळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील शेतकरी कधी ढगाळ वातावरण, कधी गारटा तर कधी पाऊस अनुभवत आहेत. त्यामुळे रब्बीचा हंगाम धोक्यात आला असून, या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आल्याचे चित्र आहे.
रब्बी हंगामातील गहू पिकाला पावसाचा फायदा असला, तरी धुकदेखील पडत असल्याने गव्हावर नुकसानकारक तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तर हरभऱ्यावर घाटेअळी पडायला सुरवात झाली आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे नगदी पिके असलेल्या कांदा व बटाटा पिकांवर विपरित परिणाम होत आहेत, तर बहुतांशी भाजीपाला वर्गीय पिकांना याचा चांगलाच फटका बसल्याचे चित्र तालुक्यात आहे.
निढळ परिसरात ज्वारीचे मोठे नुकसान
दरम्यान, सोमवारी (ता. तीन) रात्री निढळ परिसरात झालेल्या जोरदार पावसाने कणसावर असलेल्या ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, तर निढळ, दरूज या भागातील अनेक शेतात आगाप ज्वारीचे पीक पूर्णपणे झोपलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.