मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २६ ऑक्टोबरला फलटण दौऱ्यावर; विकासकामांचे भूमिपूजन, पक्षप्रवेशाची शक्यता निवडणुकांच्या तोंडावर दौऱ्याला विशेष महत्त्व; जिल्ह्याचे लक्ष फलटणकडे


स्थैर्य, फलटण, दि. २१ ऑक्टोबर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या २६ ऑक्टोबर रोजी फलटण दौऱ्यावर येत असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. या दौऱ्यादरम्यान फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होणार आहेत. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दौऱ्यात प्रामुख्याने फलटण-कोरेगाव मतदारसंघातील मंजूर झालेल्या आणि पूर्णत्वास आलेल्या विकासकामांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

शेकडो कोटी रुपयांच्या या कामांमुळे मतदारसंघाच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असल्याने या कार्यक्रमांना विशेष महत्त्व आले आहे.

या दौऱ्यादरम्यान काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असलेल्या काही प्रमुख नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मुख्यमंत्र्यांचा हा दौरा होत असल्याने, याला निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्याचाच एक भाग मानले जात आहे.

या दौऱ्यातून भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा आणि आगामी निवडणुकांसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण तालुक्यासाठी काही विशेष घोषणा करणार का, याकडे सर्वांची उत्सुकता लागली आहे. तालुक्याच्या विकासासाठी काही नवीन प्रकल्प किंवा निधीची घोषणा झाल्यास त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर दिसून येऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार आणि कोणत्या घोषणा करणार, यावरच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाची नजर असणार आहे.


Back to top button
Don`t copy text!