सुमधुर गीतांनी सातार्‍यात उजळली दिवाळी पहाट

दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे शाहूपुरीत आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

शाहूपुरी – दिवाळी पहाट कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना मुकुंद फडके. त्यावेळी शिरीष चिटणीस, विनायक भोसले, आप्पासो शालगर, प्रशांत कुलकर्णी व इतर.

स्थैर्य, सातारा, दि. 21 ऑक्टोबर – दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाहूपुरी चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमात आनंद यात्री ग्रुपच्या कलाकारांनी अनेक सुमधुर गाणी सादर करून दिवाळी पहाट खर्‍या अर्थाने उजळून टाकली.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून काका पाटील, मुकुंद फडके, शिरीष चिटणीस, श्रीकांत कात्रे, शिल्पा चिटणीस, संध्या चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
या दिवाळी पहाट कार्यक्रमाला या कार्यक्रमांमध्ये मराठी- हिंदी सुश्राव्य, सुमधुर गीतांमध्ये प्रार्थना, भक्ती गीते, भावगीते गवळण, लावणी, लोकगीते, प्रेम गीते या सारख्या गीतांचा समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुकुंद पांडे, प्रशांत कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, अ‍ॅड. लक्ष्मीकांत अघोर, सौ प्रिया अघोर, अ‍ॅड. रेश्मा वाळिंबे ’ मधु गिजरे ’विजया चव्हाण’ परितोष अघोर यांनी विविध गाणी सादर केली.या कार्यक्रमाची सुरुवात ‘गुड्डी’ चित्रपटातील ‘हमको मन की शक्ती देना या गीताने झाली. त्यानंतर ‘चल उठ रे मुकुंदा’,‘शोधीशी मानवा राउळी मंदिरी’, ‘ज्योती कलश छलके’, ‘ विठू माऊली तू माऊली जगाची, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘धुंद हा एकांत’, ‘येशील येशील येशील’,‘आली माझ्या घरी, ही दिवाळी’, ‘सूर तेच छेडीता’ ‘रेशमाच्या रेघानी’ अशा प्रकारची गाणी सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ‘लखलख चंदेरी’, ‘सखी मंद झाल्या तारखा’ या गाण्याला रसिकांनी चांगलाच ठेका धरला. कार्यक्रमात ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे यांनी केली. अ‍ॅड. स्नेहल कुलकर्णी यांनी निवेदन केले. सचिन शेवडे यांनी सिंथसायझरवर, विजय कांबळे यांनी ऑक्टोपॅडवर आणि कमलाकर दळवी यांनी तबल्यावर उत्कृष्ट साथ दिली.
ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके म्हणाले, गेली 19 वर्षे सातत्याने दिवाळी पहाट हा कार्यक्रम सादर करून शिरीष चिटणीस आणि त्यांच्या दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने सातारचे सांस्कृतिक वैभव जपले आहे. दीपावली या सणाचे नातेसंबंध जपणारे महत्त्व याविषयी सांगितले.
शिरीष चिटणीस म्हणाले, मुकुंद फडके हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. तसेच मुकुंद पांडे यांचा आनंदीयात्री हा ग्रुप त्यांनी उत्तम प्रकारे तयार केला आहे. प्रत्येक गायकाला त्याच्या आवाजानुसारच ते गाणे गायला देतात.

प्रा. संध्या चौगुले म्हणाल्या, दिवाळीच्या दिवशी एक सुंदर संगीत सकाळ दीपलक्ष्मी पतसंस्था व शिरीष चिटणीस यांच्या माध्यमातून गिफ्ट म्हणून समस्त सातारकरांना मिळाली.
काका पाटील म्हणाले, दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे 19 वर्ष सातत्याने दिवाळी पहाट हा कार्यक्रम सुरु आहे. ‘करा ओके’ या सारख्या कार्यक्रमांना सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत हक्काचे व्यासपीठ दिले जात आहे. त्यांची टीम सुद्धा चांगले काम करीत आहे, तसेच संस्थेच्या विविध उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले .
यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कलाकारांचा आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास दीपलक्ष्मीपतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले शाहूपुरी शाखेचे शाखाधिकारी रवींद्र कळसकर, आप्पासो शालगर, लालासो बागवान, प्रदीप देशपांडे, अनिल चिटणीस, जगदीश खंडागळे तसेच शाहूपुरी परिसरातील रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!