
दैनिक स्थैर्य | दि. ११ मे २०२४ | फलटण | हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिल्यानंतर राज्यासह फलटण तालुक्यात शुक्रवारी (ता.१०) दिवसभर ऊन व ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. यामुळे कमाल तापमानात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असल्याचे बघायला मिळाले.
आठवड्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला होता. तब्बल ४३.५ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेल्याने अंगाची लाहीलाही झाली होती. अशा परिस्थितीत नागरिक घराबाहेर पडेनासे झाले होते.
मात्र, हवामानातील बदलामुळे दोन दिवसांपासून शहरांसह तालुक्यातील सर्वच भागांत ढगाळ वातावरणासह वारे सुद्धा बघायला मिळाले आहे. त्यामुळे हवेतील गारवा वाढला असून, परिणामी कमाल व किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट झाली आहे.