
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण तालुक्यातील सालपे येथे हवामान-अनुकूल ऊस शेती प्रक्षेत्र भेट व कार्यशाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
स्थैर्य, फलटण, दि. ०९ ऑक्टोबर : बदलत्या हवामानाचा आणि दुष्काळाचा मुकाबला करत उसाचे शाश्वत उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर टाळून शेतीचा खर्च कमी करणे काळाची गरज बनली आहे. सिंजेंटा फाऊंडेशन इंडिया (SFI) आणि एन्व्हायर्नमेंटल डिफेन्स फंड (EDF) यांच्या संयुक्त विद्यमाने सातकी वस्ती, सालपे येथे ‘हवामान-अनुकूल ऊस पीक प्रक्षेत्र भेट व शेतकरी परिसंवाद कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. प्रयोगशील शेतकरी हनुमंत कोळपे यांच्या ऊस प्रात्यक्षिक क्षेत्रावर पार पडलेल्या या उपक्रमास १०० हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.
आधुनिक आणि वैज्ञानिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन
कार्यक्रमाचे अध्यक्ष बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. महेश बाबर यांनी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती ऐवजी वैज्ञानिक तंत्रज्ञान अंगीकारण्याचे आवाहन केले. EDF चे अमरेष चौधरी व SFI च्या डॉ. गजानन राजूरकर यांनी प्रकल्पाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. नेटाफिमचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ सतीश राठोड यांनी सूक्ष्म ठिबक सिंचन, ‘पीएच मीटर’चा वापर आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाची माहिती दिली, तर सिंजेंटाचे टेरिटरी मॅनेजर सुजय गोलांडे यांनी व्यावसायिक ऊस शेतीबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी केव्हीकेचे संग्राम पाटील व सहाय्यक कृषी अधिकारी कुणाल उपस्थित होते.
थेट प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष
या कार्यशाळेत जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणारे ‘हायड्रोजेल’ आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणारे ‘बायोचार’ यांचे सॅम्पल दाखवून माहिती देण्यात आली. हुमणी व खोडकिडीचा नैसर्गिक बंदोबस्त करणाऱ्या सौर ऊर्जेवरील ‘सोलर लाईट ट्रॅप’ यंत्राचे कार्य स्पष्ट करण्यात आले. तसेच उसाचे पाचट न जाळता ते जागेवरच कुजवून खत बनवण्याची ‘वेस्ट डीकंपोजर’ जैविक प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखवण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन सातारा जिल्हा समन्वयक कैलास शिंदे यांनी केले. प्रकल्प अधिकारी ऋषिकेश झागरे, किरण कंक आणि दत्तात्रय कोळपे यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी परिश्रम घेतले.



