दैनिक स्थैर्य | दि. 11 जुलै 2024 | बरड | सूर्यकांत भिसे | शेतशिवारातून भक्तीचे मळे फुलवित आषाढी वारीने पंढरीस निघालेला श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा बुधवारी सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामी पोहोचला. उद्या गुरुवार दि.११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा सोहळा धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.
दरम्यान फलटण येथील क्रांतीवीर नाना पाटील चौकात रात्री अडीच वाजल्यापासून अडकलेली वाहने पुढे काढा असे सांगण्यास गेलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य व वारकरी फडकरी दिंडी समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माउली जळगांवकर व बाळासाहेब चोपदार यांची अति . पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल व फलटण शहरचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्यात झालेल्या बाचाबाचीच्या निषेधार्थ वारक-यांनी पोलिसांचा निषेध व्यक्त केला तर बरड पालखी तळावर पोलिसांनी माफी मागितल्यानंतर वादावर पडदा पडला.
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा l
आनंदे केशवा भेटताचि ll
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी l
पाहिली शोधुनी अवघी तिर्थे ll
असे म्हणत जेष्ठ वद्य अष्टमीला लाखो वैष्णवासंगे माहेराच्या ओढीने पंढरीस निघालेला ज्ञानराजांचा पालखी सोहळा मजलदरमजल करीत सातारा जिल्ह्याच्या सीमेवर येऊन दाखल झाला आहे. टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरीनामाच्या जयघोषात अखंडपणे वाटचाल करीत वारकरी पंढरीच्या ओढीने निघाले आहेत. पहाटे माऊलींची पवमान पूजा व रूद्राभिषेक सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांच्या हस्ते घालण्यात आला. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी ६.३० वाजता हा सोहळा बरड मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.
पालखी तळावरील वाहने बरडच्या दिशेने निघाली परंतु रावरामोशी पुल अरुंद असल्याने व तेथे एक अपघातग्रस्त वाहन अडकल्याने पालखीची संपुर्ण वाहतुक रात्री अडीच वाजलेपासून खोळंबली. हे वाहन काढून वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यासाठी सकाळचे साडेसात वाजले . क्रांतीवीर नाना पाटील चौकात कर्तव्यात असलेल्या अप्पर पोलिस अधिक्षक आंचल दलाल व फलटण शहरचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांना वाहने पुढे काढण्यासाठी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, विश्वस्थ भावार्थ देखणे, वारकरी फडकरी दिंडी समाजाचे अध्यक्ष तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ ज्ञानेश्वर माउली जळगांवकर, बाळासाहेब चोपदार आदी सांगत असतानाही पोलिस मात्र अरेरावीची भाषा करताना दिसत होते.
पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा हे तर माउली जळगांवकर यांच्यावर भडकले व त्यांनी पोलिसांना “याला घ्या रे आत” असे म्हणताच एकच खळबळ माजली. बाळासाहेब चोपदार व अप्पर पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांच्यातही वाहने सोडण्यासाठी खडाजंगी झाली. अखेर सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी मध्यस्थी करुन पालखी सोहळा क्रांतीसिंह नाना पाटील चौकातुन बरडकडे मार्गस्थ केला.
श्रीराम साखर कारखाना, श्रीराम बझार, श्रीराम एज्युकेशन संस्था इत्यादिंच्या वतीने सोहळ्याचे मार्गावर स्वागत करण्यात आले. साखर पोते, तांदळाचे पोते, चहा, केळी यांचे वाटप यावेळी करण्यात आले. सकाळची वाटचाल मंद वार्याच्या झुळुकेमुळे सुखकर वाटत होती. आज सकाळपासूनच कधी उन तर पावसाळी वातावरण होत होते. फलटण ते विडणी हा प्रवास अत्यंत सुखकर वाटत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे मळे ऊस, केळी, मका, कडधान्य, वांगी आदि पिकांनी व फळभाज्यांनी फुलले होते. हे मळे हरिनामात व टाळ मृदुंगाच्या गजरात डोलत आहेत असेच वाटत होते. वार्यांची मंद झुळूक मनाला गारवा देत होती. वारकर्यांना गर्द झाडीतील ही वाटचाल सुखकर वाटत होती. भजनालाही रंग चढत होता. वारकरी आनंदाने नाचत गात वाटचाल करीत होते.
सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी १० वाजता विडणी येथे पोहोचला. शेतामध्ये वारकर्यांनी सकाळची न्याहरी उरकली.
विडणी ते पिंपरद या वाटचालीत वारकर्यांच्या स्नानासाठी शेतकऱ्यांनी शॉवरची सोय केली होती. या इंग्लिश स्नानाने वारकरी वारीच्या वाटचालीत सुखावून गेले. सोहळा दुपारचे नैवेद्य व भोजनासाठी पिंपरद येथे दुपारी १२ वाजून ४५ वाजता पोहोचला. येथे सोहळ्याचे स्वागत सरपंच स्वाती भगत, उपसरपंच सागर बोराडे, पोलिस पाटील सुनिल बोराडे, ग्रामसेवक महादेव बळीप, सदस्य हनुमंत शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी केले. दुपारचे भोजनासाठी दिंड्यांची वाहने मात्र वेळेत पोहोचु शकली नाही.
दुपारी २.३० वाजता हा सोहळा निंबळक फाटाकडे मार्गस्थ झाला. फलटण ते बरड या वाटचालीत चौपदरी रस्त्याचे काम सुरु असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. निंबळक फाटा येथे अर्ध्या तासांच्या विश्रांतीनंतर हा सोहळा बरड मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. ढगाळ वातावरणातच पंढरी समीप आल्याने वारकर्यांच्या चेहर्यावरील उत्साह ओसंडून वहात होता. निंबळक फाटा येथील विसाव्यानंतर सोहळा सायंकाळी बरड मुक्कामी विसावला.
पोलिसांनी मागितली माफी
सायंकाळी पालखी सोहळा बरड मुक्कामी पोहोचल्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, उपअधीक्षक राहूल धस, पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी प्रमुख विश्वस्थ ॲड. राजेंद्र उमप, सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, विश्वस्थ भावार्थ देखणे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माउली जळगांवकर, बाळासाहेब चोपदार यांची भेट घेतली व झालेल्या घटने विषयी चर्चा केली. झालेली घटना गैरसमजातून व रात्रभर वाहतुक सुरळीत करण्याच्या त्रासातुन झाली आहे. माझ्या तोंडून अपशब्द गेले त्याबद्दल मी माफी मागतो असे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा म्हणाले.
त्यावर जळगांवकर, चोपदार यांनी आमचा रागवण्याचा हेतु नव्हता. रात्री अडीच वाजल्यापासून वाहने उभी आहेत. सातारा जिल्ह्यात पोलिसांचे सहकार्य मिळाले नाही. वारक-यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आम्ही वाहने अगोदर सोडा अशी विनंती करीत होतो. परंतु आपण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. आता झाले गेले विसरुन जावा असे म्हणत त्यांनी वादावर पडदा टाकला.
सोहळ्याचा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
आळंदीहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा आपल्या वैभवी लवाजम्यासह उद्या गुरुवार दि.११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता धर्मपूरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली केली असून आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.