स्थैर्य, कराड, दि. ०९ : जिल्हा शासकीय रुग्णालयात आढळलेले मृत भ्रूण प्रकरणामुळे वादाच्या भोवर्यात अडकलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यद्धतीवरून त्यांच्याविरोधात तक्रारी होत होत्या. या तक्रारींना कंटाळून त्यांनी काही आठवड्यांपूर्वी विनंती बदली मागितल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांची विनंती बदली होणार की उचलबांगडी होणार याची चर्चा सिव्हिलमध्ये होती. त्याचवेळी जिल्हा रुग्णालयात सफाई कर्मचार्याला स्वच्छता गृहात मृत अर्भक सापडल्यानंतर गदारोळ उडाला होता. अखेर कराड दौर्यावर असलेल्या आरोग्यमंत्र्यांनी यांची बदलीच झाल्याचे सुतोवाच केले.
जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा चार्ज डॉ. गडीकर यांनी ऑगस्ट 2018 मध्ये घेतला होता. त्यांच्या कार्यकाळात मॉडयुलर ऑपरेशन थिएटरची निर्मिती, जिल्हा रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्यावर आरओ प्युरिफायरची सोय अशी काही कामे त्यांच्या काळात मार्गी लागली मात्र, त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्यापासून सर्वांचाच त्यांनी रोष ओढवून घेतला होता. रुग्णावर वेळेवर उपचार आणि कामात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप अनेकदा झाला होता. जिल्हा रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरू असतानाही डॉक्टर गडीकर यांनी याकडे डोळेझाक केल्याचा आरोप होता. त्यामुळे अनेकांनी आंदोलनेही केली होती. त्याचबरोबर खासगी हॉस्पिटलच्या परवाना नूतनीकरणाच्या प्रस्तावावर डॉक्टर गडीकर यांनी स्वाक्षरी केली नव्हती. त्यामुळे खासगी डॉक्टरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. शेवटी डॉक्टरांनी लोकप्रतिनिधींना भेटून डॉक्टर गडीकरांकडून होत असलेली चालढकल निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी गडीकरांना खडसावल्यानंतर तत्काळ रुग्णालयाच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाली.
दरम्यान, मध्यंतरीच्या काळामध्ये डॉक्टर गडीकर हे अचानक गायब झाले होते. मात्र, तब्बल दोन महिन्यानंतर परत ते रुजू झाले. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे सिव्हिल मधील डॉक्टरांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. काही मोजक्या डॉक्टरांना सोबत घेऊन ते सिव्हिलचा कारभार पाहत असल्याचा आरोप सिव्हिलमधीलच डॉक्टर करत होते. अशा प्रकारच्या वारंवार तक्रारी त्यांच्या बाबत होऊ लागल्या होत्या. त्यातच चार दिवसांपूर्वी सिव्हिलमधील शौचालयाच्या पाईपमध्ये मृत अर्भक सापडले. त्यामुळे खळबळ उडाली होती. हे प्रकरण संवेदनशील असतानाही गडीकरांना यातील काहीच माहीत नसल्याचे बोलले जात होते. तथापि, त्यांच्या कार्यपद्धतीवरुन गदारोळ सुरु झाला. वारंवार होणार्या तक्रारींना कंटाळून डॉ. गडीकर यांनी काही आठवड्यांपुर्वी विनंती बदली मागितल्याचे सांगण्यात येते. त्यातच मृतअर्भक प्रकरण घडले. अखेर डॉ. गडीकर यांना हलवण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला.