
स्थैर्य, सातारा, दि. 22 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन- अडीच महिन्यांपासून सातारा शहर आणि परिसरात जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. मात्र नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आजपासून इतर सर्व प्रकारची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. असे असले तरी कोरोनाच्या संकटाची तीव्रता आजही कायम आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी आणि गरज असल्याशिवाय कोणीही विनाकारण घराबाहेर फिरू नये आणि कोरोना वाढीला निमंत्रण देवू नये, याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
गेले दोन- अडीच महिने किराणा माल, भाजीपाला, दुध, मेडिकल हि अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. अनेक दिवस दुकाने बंद राहिल्याने दुकानामध्ये काम करणारे कामगार, कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती तर, दुकानदार आणि व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. तसेच दुकाने बंद असल्याने दैनंदिन वापरातील वस्तू, कपडे आदी साहित्य मिळत नसल्याने नागरिकांचीही मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे कापड दुकाने, इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअर, मोबाईल, कटलरी आदी इतर सर्वप्रकारची दुकाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे निर्बंध घालून सुरु करण्यास परवानगी द्यावी याबाबतचा पाठपुरावा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा प्रशासनासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि मुख्य सचिवांकडे केला होता. ज्या ठिकाणची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली जाईल त्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वापर बंधनकारक करावा तसेच गर्दी होऊ नये यासाठी सोशल डिस्टंसिंग असे नियम व अटी घालून आणि दिवस व वेळ ठरवून दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाला सूचित केले होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने कन्टेन्मेंट झोन वगळून इतर सर्व ठिकाणची सर्व दुकाने आजपासून उघडण्यास परवानगी दिली आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले गेले असून दुकानदार, व्यावसायिक आणि नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. असे असले तरी कोरोनाचे संकट अजून कायम असून त्याची तीव्रता कमी झालेली नाही, याचे भान नागरिकांनी ठेवावे. दुकाने उघडली म्हणून विनाकारण कोणीही बाहेर फिरू नये. चला फेरफटका मारून येवू, असे बेजाबदार वर्तन करून प्रशासनाच्या अडचणी वाढवू नये. मिळालेल्या सवलतीचा सुयोग्य वापर करून गरजेपुरतेच घराबाहेर पडावे आणि काम झाले कि लगेच घरी परत जावे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन करून कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारकरांसह जिल्ह्यातील जनतेला केले आहे.