
स्थैर्य, पाचगणी, दि. 14 : आंबेडकर कॉलनी येथे वर्षभरापासून अनियमित व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या कारणावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत आज आंबेडकर कॉलनी येथील संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते उपस्थित नसल्याने कर्मचार्यांना निवेदन दिले आहे.
जीवन प्राधिकरणच्या पाचगणी कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे तेथील नागरिकांनी वेळोवेळी जीवन प्राधिकरणास अर्ज केले आहेत. सदर प्राधिकारणाकडून त्यांच्या अर्जांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. त्यांच्या अर्जाचा विचार सुद्धा केला जात नाही. सदर कार्यालय कोणत्याही तक्रारीकडे लक्ष घालत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र धावाधाव करावी लागत आहे. पाणी असूनही जर मिळत नसेल तर मात्र ही पाचगणीकरांना लाजीरवाणी गोष्ट आहे.
जर जीवन प्राधिकरणाने पंधरा ऑगस्टपर्यंत या कॉलनीतील पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर संतप्त नागरिक आंदोलन करणार असल्याचे पाचगणी पूर्व भारतीय बौद्ध महासंघाचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी सांगितले.