
थेट WhatsApp वर मिळवा
५ ते १७ वयोगटातील मुलांच्या आधार मधील बायोमेट्रिक अपडेट ३० सप्टेंबरपर्यंत मोफत असून त्यानंतर यासाठी शुल्क आकारले जाणार आहे.
स्थैर्य,सातारा, दि. २५ सप्टेंबर : देशातील मुलांच्या आधार मधील अनिवार्य बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) विशेष मोहीम सुरू केली आहे. ५ ते १७ वयोगटातील मुलांच्या आधारमधील बायोमेट्रिक अपडेट करण्याची सुविधा ३० सप्टेंबरपर्यंत मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मुदतीनंतर बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागणार असल्याने पालकांनी त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बायोमेट्रिक अपडेट का आवश्यक आहे?
लहान मुलांच्या वयाच्या ५ व्या आणि १५ व्या वर्षी त्यांच्या शरीरात आणि जैविक ओळखीत बदल होतात. लहान वयात आधार काढताना ५ वर्षांखालील मुलांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांचे (आयरीस) स्कॅनिंग घेतले जात नाही. त्यामुळे मूल ५ वर्षांचे झाल्यानंतर प्रथमच आणि १५ वर्षांचे झाल्यानंतर दुसऱ्यांदा बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य मानले जाते. यामध्ये मुलाचे नवीन छायाचित्र, सर्व बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांची नवी माहिती आधार प्रणालीत नोंदवली जाते.
मुदतीनंतर लागू होणार शुल्क आणि आधार केंद्रांना भेट
३० सप्टेंबरच्या मुदतीनंतर ७ ते १५ वयोगटातील मुलांच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी १२५ रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागू शकते. ५ ते ७ वर्षे आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे वेळेत केलेले अनिवार्य अपडेट मोफतच राहील. ही प्रक्रिया ऑनलाईन करता येत नसून पालकांनी पाल्यासह जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे. शालेय प्रवेश, प्रवेश परीक्षा आणि विविध सरकारी शिष्यवृत्तींचा लाभ मिळवण्यासाठी हे बायोमेट्रिक अपडेट अत्यंत आवश्यक आहे.