
दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । सातारा । जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या निविदा आणि त्यांच्या कारभाराची तातडीने चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते दिशा विकास मंच अध्यक्ष सुशांत मोरे यांना दिले आहेत. त्यामुळे 29 ऑगस्टपासून त्यांनी जाहीर केलेले उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे. मात्र, चौकशी न झाल्यास पुन्हा पंधरा सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय उपोषणाला बसण्याचा इशारा मोरे यांनी दिला आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या भ्रष्ट भोंगळ कारभारबाबत तक्रारी होऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही. दि. 29 ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांचे दरे तांब येथील निवासस्थानासमोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला होता. मात्र, सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपोषण इशाऱ्याची दखल घेऊन या प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
माता बाल संगोपन, एक्स-रे मशिन दुरुस्ती खोट्या वैद्यकेबिलावर सह्या, दिव्यांगांचे दाखले, मुंबई पुणे येथील बैठकांची कारणे देणे, बैठकांना हजर न राहणे अशा अनेक तक्रारी मोरे यांनी निवेदनाद्वारे केल्या होत्या. मेडिकल कॉलेज अडीच वर्षांपूर्वी मंजूर होऊन अद्याप त्याचा इमारतीचे काम सुरू झालेले नाही. मेडिकल कॉलेजच्या निविदांमध्ये असलेला घोळ उपसंचालक आरोग्य सेवा यांना दिसत आहे. तरी ते पाठराखण करतात. यामुळे आरोग्य उपसंचालक यांचीही तात्काळ चौकशी करण्याची मागणी सुशांत मोरे यांनी केली होती.
या सर्व मागण्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेऊन वरिष्ठ स्तरावरील चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सुशांत मोरे यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे, मात्र ते त्या पंधरा दिवसात चौकशी न झाल्यास 15 सप्टेंबर पासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात या इशारा त्यांनी दिला आहे.