सातारा पालिकेचे मुख्याधिकारी आणि भाग निरीक्षक साखरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा; जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर सागर भोगांवकर यांचे आमरण उपोषण सुरु


दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । सातारा । करंजे नाका ते मोळाचा ओढा दरम्यान रस्त्यांवर सातार्‍यातील व्यापार्‍यांनी पत्र्याची लोखंडी शेड्स उभारुन मेढा-सातारा मुख्य रस्त्यावरच गेल्या काही वर्षात अतिक्रमणे केलेली आहेत. त्याविरोधात गेली आठ महिने आंदोलने, पत्रव्यवहार करुनही त्यावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरु केले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करंजे नाका ते मोळाचा ओढा दरम्यान रस्त्यांवर सातार्‍यातील व्यापार्‍यांनी पत्र्याची लोखंडी शेड्स उभारुन मेढा-सातारा मुख्य रस्त्यावरच गेल्या काही वर्षात अतिक्रमणे केलेली आहेत. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. या अडथळ्यांमुळे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर अपघातही झाले आहेत.

अर्बन डेव्हलपमेंट ऍक्ट नुसार सातारा शहरातून जाणारा महाबळेश्वर-पंढरपूर हा राज्यमार्ग असून कायद्यानुसार सामासिक अंतर सोडणे हे सर्वांना बंधनकारक आहे. त्याशिवाय शास्ती लावता येत नाही. वास्तविक ही जागा नागरी विभागामध्ये समाविष्ट होत असल्याने ही सर्व बांधकामे रस्त्याच्या मध्यापासून 20 मीटर अंतरावर अथवा हद्दीपासून 4.5 मीटर अंतरावर (यापैकी जास्त असेल असे अंतर लागू) करण्याबाबतचा नियम आहे. आम्हाला व सातार्‍यातील तमाम जनतेला वेडे बनवण्याचे काम सातारा नगरपरिषदेने चालू केले आहे. मी सदरील अतिक्रमणासंदर्भात आठ महिन्यापासून पाठपुरावा करत असून नगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी सात निवेदने देण्यात आलेली आहेत. तरीही सातारा नगरपरिषद अतिक्रमण विभाग, नगररचना विभाग आणि सीओ यांना तीळमात्रही फरक पडलेला नाही. गोरगरिबांचे हातगाडे यांना दिसतात, पण बड्या धेंड्यांसाठी सोयीस्कर अशी नियमावली तयार केली जाते. यासंदर्भात योग्य त्या न्यायालयाकडे जाणार असून संबंधितांना चौकशी लावून निलंबित होईपर्यंत गप्प बसणार नाही.

सदरील भाग निरीक्षक सतीश साखरे हा बिगारी असताना भाग निरीक्षक हे तांत्रिक पद असताना प्लॅनवर याना सह्या करण्याचे अधिकार कोणी दिले? याबाबत चौकशी करण्यात यावी. आजपर्यंत दहा वर्षांमध्ये सतीश साखरे यांची ज्या-ज्या ठिकाणी भाग निरीक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे, त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमणाबाबत चौकशी केल्यास सर्वात जास्त अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हे सतीश साखरे यांच्या विभागात दिसून येते असा आरोप भोगावकर यांनी केला आहे .


Back to top button
Don`t copy text!