स्थैर्य, फलटण, दि. २८ : कोविड – १९, गारपीट, निसर्ग चक्रीवादळ आणि बेमोसमी पाऊस, बर्ड प्ल्यू अशा संकटाच्या मालिकांशी सामना करीत आपण पुढे वाटचाल करीत आहोत. कोविड काळात सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या सर्व संकटाशी नेटाने आणि निर्धाराने आपण लढत आहोत. संकटातून संधी निर्माण करत महाराष्ट्राच्या परंपरा आपण कायम राखू याचा मला विश्वास वाटतो, असे प्रतिपादन फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले.
फलटण येथील पोलीस परेड मैदानावर प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटील, फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भरत किंद्रे, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य शासकीय ध्वजवंदन संपन्न झाले.
फलटण पंचायत समिती येथे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गट विकास अधिकारी सौ. अमित गावडे, सहाय्यक गट विकास अधिकारी विनायक गुळवे, उपसभापती सौ. रेखा खरात, सदस्य सचिन रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण नगरपरिषद येथे नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले. या वेळी मुख्याधिकारी प्रसाद काटकर, नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर, सचिन अहिवळे, कार्यालयीन अधीक्षक मुस्ताक महात यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा कार्यक्रम मर्यादीत स्वरुपात साजरा करण्यात आला. सलामीसाठी झालेल्या संचलनामध्ये महाराष्ट्र पोलीस या मर्यादीत दलांनी सहभाग घेतला. मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगविषयक नियमांचे यावेळी पालन करण्यात आले. ध्वजवंदनानंतर प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव यांनी उपस्थित मान्यवरांची भेट घेऊन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्य शासकीय ध्वजवंदनानंतर ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’, असे नमुद करुन प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप म्हणाले की, महाराष्ट्र एकसंघ आहे आणि एकसंघ राहील. सर्वच घटकातील विचारांच्या समाजघटकांना सोबत घेऊन, सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन प्रगत, पुरोगामी, समर्थ आणि बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी महाराष्ट्र शासन काम करीत आहे. देशाच्या राज्यघटनेप्रती आपणा सर्वांचे उत्तरदायित्व आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनी संविधानाने घालून दिलेले आदर्श व मूल्ये यांच्याप्रती असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ करुया आणि एक बलशाली, प्रगतीशील व सर्वसमावेशक अशा नवीन महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. देशाच्या प्रजासत्ताकाच्या एकाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.