
दैनिक स्थैर्य | दि. ५ मार्च २०२३ | फलटण |
वयाच्या ३२ व्या वर्षी एका बेसावध क्षणी शत्रूच्या तावडीत सापडून कैद झाले. तब्बल ४० दिवस औरंगजेबाचा अमानवी छळ सहन करत आत्मबलिदान केले, पण कोणत्याही अमिषाला बळी न पडता स्वधर्म, स्वाभिमान जपून धर्मासाठी बलिदान कसे द्यावे, हे छत्रपती संभाजीराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आणि म्हणूनच ते जगातील एकमेव धर्मवीर आहेत, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केले.
जाधववाडी (फलटण) येथील श्री साईबाबा सांस्कृतिक भवनात सहावे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य विश्वासराव देशमुख, उद्घाटक संगीता जामगे, दुष्यंत जगदाळे, प्रकाश बेलोसे, प्रा.नितीन नाळे, प्रा.विजय काकडे व आदर्शमाता श्रीमती पार्वतीमाई जवळ व असंख्य साहित्यप्रेमी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, एकही युध्द न हरलेला अजिंक्य योध्दा वयाच्या १४ व्या वर्षी ‘बुधभूषणम्’, ‘नायिकाभेद’ यासारखे ६ ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिणारे व ६ भाषा मुखोद्गत असणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. पण समाजद्रोही साहित्यिक व धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरलेल्या आत्मकेंद्री गांडुळांनी त्यांची प्रतिमा खराब केली व समाजापुढे चुकीचा इतिहास मांडला. पण आज विविध माध्यमांद्वारे आपणासमोर छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर येत आहे. एकीकडे या समाजद्रोह्यांचा राग येतोय तर दुसरीकडे शिवप्रेमींची मान शरमेने खाली झुकते. पण, अशा साहित्य संमेलनातील निबंध स्पर्धा, पुस्तक परिक्षण, काव्य मैफिलीच्या माध्यमातून अबालवृध्दांना छत्रपतींचा खरा इतिहास अनुभवन्यास मिळत आहे, हेच मोठे भाग्य आहे.
माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य विश्वासराव देशमुख म्हणाले की, आजची पिढी वाचनापासून खूप दूर चालली आहे आणि अशातच नवग्रंथनिर्मिती करणारे साहित्यिक, कवी यांची मन:स्थिती द्विधा झाली आहे. पण, अशा साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे मनाला नक्कीच उभारी मिळेल यात शंका नाही. आज ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नावे त्यांचे आजोळी साहित्याचा जागर होत आहे. तो नक्कीच साहित्यिक व साहित्यप्रेमी यांना प्रेरणादायी ठरेल, असे मला वाटते. हे साहित्य संमेलन फलटण संस्थान अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उत्तुंग कार्यास समर्पित करून अॅग्रो न्यूज परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
प्रास्ताविकामध्ये संयोजक प्रकाश सस्ते यांनी हे साहित्य संमेलन आयोजित करण्याची भूमिका स्पष्ट करून जागतिक ‘मराठी राजभाषा दिन’ छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे साजरा व्हावा व मराठी भाषेला राजभाषेचा मान मिळावा, अशी मागणी करून असा ठराव बहुमताने मंजूर केला.
यावेळी मेढा, ता.जावली येथील श्रीमती पार्वतीमाई जवळ यांना यावर्षीचा ‘राष्ट्रमाता जिजाऊ आदर्शमाता’ पुरस्कार देऊन यथोचित गौरव करण्यात आला. तसेच विशेष साहित्य सेवा पुरस्कार प्राचार्य विश्वासराव देशमुख, कवी अतुल चव्हाण व विकास भोसले यांना देऊन सन्मानित करण्यात आले, तर उत्कृष्ट साहित्य सेवा पुरस्कार १) उत्कृष्ट कविता संग्रह – अॅड.विजयकुमार कस्तुरे, मनिषा पाटील-हरोलीकर, डॉ. श्रीकांत पाटील, हणमंत पडवळ, सौ.विद्या रमेश जाधव. २) उत्कृष्ट गझल संग्रह – सिराज शिकलगार, यशवंत पगारे, प्रसन्नकुमार धुमाळ. ३) उत्कृष्ट कादंबरी – डॉ.सुनिल देसाई, संजय महल्ले, शितल देशमुख डहाके, ४) उत्कृष्ट कथासंग्रह – प्रा.यशवंत माळी, डॉ.सुभाष कटक, दौंड, सुभाष वाघमारे, ५) उत्कृष्ट आत्मकथन – प्रा. रामकिशन समुखराव, जयसिंग पाटील, मंगल ढोकळे, ६) उत्कृष्ट संशोधनात्मक साहित्य – डॉ. कृष्णा भवारी, डॉ.चंद्रकांत पोतदार, ७) उत्कृष्ट आध्यात्मिक साहित्य – अनिल शेवाळकर, प्रा.डॉ. किरण वाघमारे, सौ. सुभा आत्माराम लोंढे, ८) उत्कृष्ट खंडकाव्य – साईनाथ फुसे, बबन धुमाळ ९) उत्कृष्ट बालसाहित्य – आयुब पठाण,लोहगांवकर, सौ.शोभा अवसरे, उत्तम सदाकाळ यांना साहित्यसेवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी निबंध स्पर्धेतील खुला गट व पाचवी ते आठवी गटातील विजेत्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे सह सुमारे १७ जिल्ह्यातील साहित्यिकांनी हजेरी लावली.
संमेलनाच्या दुसर्या सत्रात निमंत्रित कवींचे बहारदार काव्यसंमेलन संपन्न झाले. त्यामध्ये राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या कवींनी आपल्या काव्यरचना सादर करून साहित्य रसिकांची वाहवा मिळवली. रानकवी जगदीप वनशिव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अध्यक्षपदी व्याख्याते व साहित्यिक दत्ता भापकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.विजय काकडे उपस्थित होते.
संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रा. विजय काकडे, प्रा. नितीन नाळे, संयोजक प्रकाश सस्ते व अॅग्रो न्यूज परिवारावर प्रेम करणार्या असंख्य कार्यकत्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार अॅग्रो न्यूज परिवाराचे कार्याध्यक्ष प्रा. नितीन नाळे यांनी मानले.