चंद्रकांत अहिवळे कुशल संघटक, आक्रमक आणि संयमी नेता काळाच्या पडद्याआड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । फलटण । भारतीय दलीत पँथरपासून कार्यरत असलेले फलटण येथील लढाऊ पँथर चंद्रकांत अहिवळे यांचे अल्पशा आजाराने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सातारा येथे रात्री 2 वाजता निधन झाले.त्यांच्या निधनामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजात दुःख व्यक्त केले जात आहे.फलटणच्या आंबेडकरी चळवळीला विधायक विकासाकडे व रचनात्मक कार्याकडे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत अहिवळे. त्यांच्या जाण्यामुळे समाजात निश्चितच एक पोकळी निर्माण झाल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते व फलटण भारतीय दलित पॅंथरचे माजी अध्यक्ष दत्ता अहिवळे सर यांनी व्यक्त केली आहे.

ते आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात की, “प्रत्येकाला जिवन प्रवासात अनेक लोक भेटतात. काही चेहरे सुद्धा लक्षात राहत नाहीत तर काही जीवनालाच कलाटणी देऊन कायमस्वरूपी मनात अविस्मरणीय राहतात. चंद्रकांत अहिवळे हे एक. माझ्या जिवनाला विधायक कलाटणी देणारी प्रथम व्यक्ती. १८ वर्षाचे वयं म्हणजे नुस्ती मौजमजाचे सिनेमा, नाचगाणी, फॅशन आणि स्वप्न रंजनाच्या विश्वात रममाण असलेली अन् काहीशी भरकटलेली आमची तरूणाई. का आणि कसे आकर्षित झालो आम्ही चंद्रकात नावाच्या वादळा कडे.स्वप्न रंजनाच्या विश्वातून आम्ही बाहेर पडून सामाजिक न्यायासाठी आक्रमक व गतीमान कसे झालो. पॅंथर. होय आम्ही पॅंथर झालो. फुलांभोवती फिरणाऱ्या भुंग्यांप्रमाणे मुलींभोवती फिरणारी तरूणाई चंद्रकांत नावाच्या वादळा भोवती वेगाने फिरू लागली.चंद्रकांत च्या आदेशाने अन्याय करणाऱ्यांवर पॅंथरच्या वेगाने तुटून पडू लागली.अन्याय समाजातील असो अथवा समाजाबाहेरील असो किंवा प्रशासकीय असो चंद्रकांतने त्या विरोधात नेहमी पँथर प्रमाणे चवताळून झेप घेतली. आणि अन्यायाचा प्रतिकार केला.निर्व्यसनी, व्यायामाने तयार झालेला पिळदार देह. तेवढाच परखड आणि करारी आवाज. समाजाबद्दल तळमळ, तसेच जबरदस्त संघटन कौशल्य. यामुळेच फुलांभोवती फिरणारे भुंगे कधी पॅंथर झाले ते कोणालाही समजलेच नाही. १९८५/८६ साल आमचा सामाजिक कार्यासाठी झपाटलेला काळ. आज ३७ वर्षे झाली तरी आम्ही कार्यरत आहोत, गतीमान आहोत ते चंद्रकांत नावाच्या झंझावती वादळांमुळे.आज चंद्रकांत नावाचं हे वादळ शांत झालं. अनंतात विलिन झालं. अविस्मरणीय अठवणी ठेवून.

चंद्रकांतला माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून आणि संपूर्ण आंबेडकरी समाजाकडून भावपूर्ण आदरांजली !” चंद्रकांत अहिवळे यांनी तरुणाईलाच नव्हे तर फलटणच्या आंबेडकरी समाजाला विधायक विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचे काम केलं. फलटणच्या दैदीप्यमान आंबेडकरी चळवळीच्या इतिहासामध्ये चंद्रकांत अहिवळे यांचे नाव महत्त्वाचं मानलं जातं. १९८५-८६ पासूनच आक्रमकता, नियोजनबद्धता, धम्म, साहित्य, कला यातून समाजकारणाला सुरुवात झाली. त्याचे सर्वात मोठे श्रेय चंद्रकांत अहिवळे यांना जाते. त्यांच्या जाण्यामुळे फलटणच्या आंबेडकरी चळवळीतील एक सुवर्णपान गळून पडले आहे. ज्या कार्यकर्तुत्वामुळे आज अनेक तरुण कार्यकर्ते विधायक विकासाची आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन जात आहेत. संपूर्ण फलटण सह सातारा जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाच्या वतीने बहुजन समाजाच्या वतीने चंद्रकांत अहिवळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!! त्यांच्या जाण्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दुःख व्यक्त केला आहे. त्यांच्या विचार कार्याला भावपूर्ण आदरांजली!!!


Back to top button
Don`t copy text!