खासगी सावकारास ठोकल्या बेडय़ा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २८ :  करंडी (ता. सातारा) येथील एकास 2018 सालात 10 टक्के व्याजाने 10 लाख 40 हजार रुपये दिले. त्यानंतर वारंवार कर्जदारास त्रास देत फक्त व्याजापोटी 31 लाख 20 हजार रुपये उकळल्यानंतर देखील भूक न भागलेल्या खिंडवाडी (ता. सातारा) येथील खासगी सावकार ज्ञानदेव आनंदराव गोडसे (वय 54) याने आणखीन वसुलीसाठी कर्जदाराचे खुनाच्या उद्देशाने अपहरण केले. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी ज्ञानदेव गोडसे याला बेडय़ा ठोकल्या आहेत.

दरम्यान, शुक्रवार गोडसे याला न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांनी दिली. या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करंडी (ता. सातारा) येथील दीपक सुभानराव जाधव (वय 50) यांनी 10 नोव्हेंबर 2018 रोजी खिंडवाडीतील खासगी सावकार ज्ञानदेव गोडसे याच्याकडून 10 लाख 40 हजार रुपये कर्जाऊ रक्कम महिना 10 टक्के व्याजाने घेतली होती. त्यानंतर गोडसे याने वारंवार त्रास देत दीपक जाधव यांच्याकडून 2020 सालापर्यंत 31 लाख 20 हजार व्याजाची रक्कम वसूल केली आहे.

त्यानंतर देखील गोडसे वांरवार जाधव यांना व्याजासाठी त्रास देत होता. 5 जून रोजी सकाळी 6 वाजता गोडसे करंडी येथे जाधव यांच्या घरी गेला व त्यांना घरातून जबरदस्तीने ताब्यात घेवून जीपमधून घेवून गेला. त्यानंतर गोडसे याने जाधव यांना एमआयडीसी, सदरबझार, बीएसएनएल वसाहत, शेंद्रे शिवाजीनगर, शेरेवाडी येथे धमकी देत फिरवले. यावेळी गोडसे याने जाधव यांच्या आई व भाऊ यांना देखील फोन करुन शिवीगाळ, दमदाटी करत धमकावले.

शेवटी 10 लाखाच्या बदल्यात केवळ व्याजापोटी 31 लाख रुपये देवून देखील खासगी सावकार गोडसे याच्याकडून सुरु असलेल्या दहशतीमुळे कंटाळून जावून दीपक जाधव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत त्यांनी दि. 25 रोजी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हय़ाचे गंभीर स्वरुप पाहून पोलिसांनी तातडीने खासगी सावकार ज्ञानदेव गोडसे याला अटक केली आहे. 

खासगी सावकारीचे अनेक प्रकार जिल्हय़ात सुरु आहेत. मात्र याबाबत भीतीपोटी तक्रारदार पुढेच येत नाहीत एवढी दहशत हे खासगी सावकार माजवत असतात. करंडीतील तक्रारदार पुढे आल्याने खासगी सावकारीविरोधात उठलेल्या आवाजाला पोलीस दलाने बळ देण्याची गरज आहे. व्याजावर व्याज घेणारे सावकार मुद्दल सोडून लाखो रुपये मिळाले तरी शांत होत नाहीत. या सावकारीचा पर्दाफाश पोलीस दलाला करावा लागणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!