दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मराठा आरक्षण मागणीप्रश्नी सोमवार, दि. २५ ऑक्टोबरपासून येथील शासकीय कार्यालये असलेल्या अधिकार गृह इमारतीसमोर साखळी उपोषण सुरू असून त्यामध्ये तालुक्यातील अबालवृद्धांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महिला व तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. संपूर्ण तालुक्यात मराठा आरक्षण ही एकच चर्चा सुरू आहे.
अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे मराठी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला राज्यातून मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना फलटण शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवही आता मागे नाहीत. मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज माध्यमातून करण्यात आलेल्या नियोजनानुसार साखळी उपोषणासाठी जी गावे निश्चित करण्यात येत आहेत, त्याप्रमाणे त्या त्या गावातील स्त्री – पुरुष मोठ्या संख्येने एकत्र येऊन वाहनांच्या ताफ्यासह भगवे ध्वज घेऊन आंदोलनस्थळी दाखल होऊन दिवसभर साखळी उपोषणात सहभागी होत आहेत.
आता नाही तर कधीच नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय यासारख्या गगनभेदी घोषणा देत विशेषतः महिला आणि तरुण वर्ग अत्यंत शिस्तीने व शांततेने आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत.
दरम्यान, फलटण तालुक्यातील गावागावात राजकीय पुढार्यांना विशेषतः लोकप्रतिनिधींना आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी आणि आगामी काळातील सर्व निवडणुकांमधील मतदानावर बहिष्कार घालण्याचे निर्णय होत असून तसे फलक संबंधित गावात लावण्यात येत आहेत तर काही ठिकाणी ग्रामपंचायत ठराव होत आहेत.
विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामध्ये जैन सोशल ग्रुप, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना, प्रहार संघटना, दिव्यांग संघटना, फलटण तालुका वकील संघटना, फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना, पोलीस पाटील संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गट फलटण, फलटण भारती तेली समाज, महिला बचत गट फलटण, शरद जोशी विचारमंच, शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र फलटण, काठीयावाडी मेहतर समाज विकास मंडळ फलटण, फलटण तालुका महिला संघटना फलटण वगैरे असंख्य संघटनांचा समावेश आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला फलटण तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ३० हून अधिक गावात नेत्यांना तसेच राजकीय पुढार्यांना गावबंदी करण्यात आली आहे, तर पूर्व भागातील अतिशय संवेदनशील गाव असलेल्या राजाळे गावाने कडकडीत बंद पाळून मराठा आरक्षणाचा एल्गार पुकारला आहे.
आज निंभोरे येथील मराठा समाजातील महिला भगिनी व थोरामोठ्यांनी संपूर्ण गाव एकत्र करीत उपोषणस्थळी हजेरी लावत टाळमृदूंगाच्या गजरात भजन करीत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करीत पायी चालत तहसील कार्यालय फलटण येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभाग घेतला. तसेच अनेक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, आज तिसर्या दिवशी पिंपळवाडी साखरवाडी, जिंती, निंभोरे, भिलकटी, होळ, खुंटे, शिंदेवाडी, सस्तेवाडी, चौधरवाडीसह अनेक गावातील हजारो मराठा बांधव साखळी उपोषणात सहभागी झाले होते.