दैनिक स्थैर्य | दि. 07 एप्रिल 2024 | फलटण | फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसह इतर सर्व जयंती व उत्सव हे कायद्याच्या चौकटीत बसूनच जयंती साजरी करावी लागेल. यावेळी पोलीस प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य आपणास राहील; असे आश्वासन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी यावेळी दिले.
फलटण शहर तालुकास्तरीय शांतता कमिटीच्या बैठक ही नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानी निवासी नायब तहसीलदार सौ. संजीवनी बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंतकुमार शहा, ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फलटण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होत असते. फलटण शहरामध्ये जयंती साजरी करण्यासाठी तालुक्याच्या विविध भागातून नागरिक घेत असतात. फलटण शहरातील जयंती साजरी झाल्यानंतर तालुक्याच्या विविध भागांमध्ये महिनाभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असते. तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ग्रामीण भागामध्ये साजरी होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून निर्बंध घातले जात आहेत. याबाबत निर्बंध नको; असे मत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी कायद्याच्या चौकटीत बसूनच जयंती साजरी करावी लागेल असे स्पष्ट निर्देश यावेळी दिले.
आंबेडकर जयंती बाबत ज्या परंपरा नुसार मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये आम्ही नव्याने कोणतीही मागणी केली नाही. आम्ही प्रतिवर्षी प्रमाणे जयंती साजरी करण्याची परवानगी मागत आहेत. आणि जर आम्हाला जयंती साजरी करण्याची परवानगी मिळत नसेल तर आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल. फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात सुद्धा आंबेडकर जयंती दमदार साजरी होणार आहे; असे मत माजी नगरसेवक सचिन अहीवळे यांनी यावेळी व्यक्त केले.
फलटण शहरात एकाच शिवजयंतीसाठी परवानगी द्या : अशोकराव जाधव
फलटण शहरांमध्ये एकत्र शिवजयंतीच्या वेळेस विविध प्रकार घडलेले होते यावेळी सुद्धा असे घडण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे फलटण शहरांमध्ये एकाच शिवजयंतीसाठी परवानगी देण्यात यावी व याबाबत प्रशासनाने पुढाकार हवा अशी मागणी फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी यावेळी केली.
शहरातील फळकुट दादांचे वाढदिवस साजरे करणे बंद करा
फलटण शहरामध्ये रात्री अपरात्री विविध चौकात व इतर सार्वजनिक ठिकाणी शहरातील फळकुट दादा वाढदिवस जल्लोषात साजरे करत असतात. यावेळी मोठ्या मोठ्याने साउंड सिस्टिम व डीजे सुद्धा लावले जातात. तरी सदरील वाढदिवसावर कायमस्वरूपी पोलिसांनी करडी नजर ठेवत असे साजरे होणारे वाढदिवस बंद करावेत; अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खंदे समर्थक जमशेद पठाण यांनी यावेळी केली.
यात्रा, जत्रा व जयंतीमध्ये पक्षाची गाणी वाजवू नयेत
फलटण शहरामध्ये आगामी काळात यात्रा, जत्रा व जयंतीचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येते. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. यामुळे या यात्रा, जत्रा व जयंती कालावधीत पक्षाची गाणी यावेळी वाजवली जाऊ नयेत. जर असे आढळून आले तर आचारसंहिता अभंग केल्याबाबतची तक्रार प्रशासनाने दाखल करावी. यासोबतच फलटण शहर शांतता कमिटीच्या बैठकीला फलटण नगरपरिषदेचा कोणीही अधिकारी उपस्थित नाही; याबाबत सुद्धा नगरपालिकेवर कारवाई करण्यात यावी असे मत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आमिर शेख यांनी यावेळी केली.
दोन पेक्षा अधिक गुन्हे असलेल्यांना तडीपार करा
सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. यामध्ये ज्यांच्यावर दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे आहेत; अशा सर्वांना फलटण शहरासह तालुक्यातून तडीपार करण्यात यावे. याबाबत पोलीस प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्यात यावी; अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सनी काकडे यांनी केली.