दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार, दि. २२ ऑक्टोबरपासून निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाने काही बाबी सांगितल्या आहेत. त्या सर्व बाबींचा उमेदवारी अर्ज भरताना बारकाईने विचार करून उमेदवारी अर्ज भरण्यात यावा, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विहीत नमुन्यातील फॉर्म नं. २ बी सादर करायचा आहे. या अर्जासोबत पाचशे रुपये किमतीच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त व नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांनी यासोबत फॉर्म ‘ए’ व फॉर्म ‘बी’ जोडणे आवश्यक आहे.
उमेदवारी अर्ज दिनांक २२ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भरता येणार आहेत. वरील कालावधीत शनिवारी व रविवारी सार्वजनिक सुट्टी राहील, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
उमेदवाराचे वय २५ वर्षे पूर्ण किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे आहे. उमेदवार कोणत्या पक्षामार्फत निवडणूक लढवत आहे त्याचा व त्या पक्षाच्या निवडणूक चिन्हाचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्रासोबत अनुसूचित जाती राखीव मतदारसंघासाठी पाच हजार रुपये भरून त्याची पावती उमेदवारी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवार अनुसूचित जाती किंवा जमातीचा असेल तर त्याचा उल्लेख अर्जात करणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचेही निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सांगितले.
नामनिर्देशन दाखल करताना उमेदवार व इतर चार अशा एकूण पाच व्यक्ती यांनाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात प्रवेश करता येईल. उमेदवारास जास्तीत जास्त तीन वाहने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात १०० मीटरपर्यंत आणण्याची परवानगी आहे.
- उमेदवारांना नामनिर्देशनपत्र ऑनलाईन भरता येणार आहे.
- उमेदवारांना ऑनलाइन नामनिर्देशन पत्र भरणेसाठी http://suvidha.eci.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून अर्ज भरता येईल व त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करावी लागेल.
- अर्जासोबत पाचशे रुपये किमतीच्या स्टॅम्पपेपरवर नोटरी करणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे.
- दोनपेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन दाखल करता येणार नाही.
- विधानसभा निवडणुकीसाठी ४० लाख एवढी खर्चाची मर्यादा आहे.
- अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी कक्षात हजर असतील त्यांचेच अर्ज स्वीकारले जातील.
वरील सर्व बाबींचे पालन उमेदवारांनी अर्ज भरताना करावे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.