योगी आदित्यनाथ मुंबईतलं बॉलीवूड उत्तर प्रदेशात नेऊ शकतील का?


 

स्थैर्य, मुंबई, दि.२: सुशांत सिंह राजपूत प्रकरणी महाविकास आघाडीवर सरकारवर, मुंबई पोलिसांवर
अनेक आरोप झाले. ऐन कोरोनाच्या काळात यावर देशभरात राजकारण रंगलं. त्यात
भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आघाडीवर दिसले.

सप्टेंबर
2020 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी युपीमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी
1000 एकर जागेत फिल्मसिटी उभारणार असल्याची घोषणा केली.

या
पार्श्‍वभूमीवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 1 डिसेंबरला
मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ते मुंबईत
दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली.

फिल्मसिटीच्या प्रकल्पाबाबत यामध्ये चर्चा झाल्याचं कळतंय.
2 डिसेंबरला योगी आदित्यनाथ हे मुंबईच्या ट्रायडेंट
हॉटेलमध्ये काही निर्माते, गूंतवणूकदार आणि उद्योगपतींशी बैठक घेऊन चर्चा
करणार आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर आता विविध
स्तरातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरू
झाले आहेत.

या दौऱ्याला काय राजकीय पार्श्वभूमी आहे? महाविकास
आघाडीला योगी आदित्यनाथ यांचा दौरा का रुचलेला नाही? आरोप-प्रत्यारोपांत
किती तथ्य आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणारा हा
रिपोर्ट..

‘हिंमत असेल तर फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेऊन दाखवा’

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासादरम्यान बॉलीवूडमधल्या ‘नेपोटिझम’चे दाखले समोर येऊ लागले.

अमली
पदार्थ सेवन केल्याप्रकरणी अनेक बड्या अभिनेता आणि अभिनेत्रींची
एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. देशभरातून बॉलीवूड क्षेत्रावर टीका सुरू
झाली.

यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी
बोलताना म्हटलं, “सध्या देशाला एका चांगल्या फिल्मसिटीची गरज आहे. सर्वांत
मोठ्या हिंदी फिल्म उद्योगासाठी मुंबई प्रसिद्ध आहे. पण देशातली सर्वांत
मोठी आणि सुंदर फिल्मसिटी ही उत्तरप्रदेशला उभारण्यात येणार आहे. ही
फिल्मसिटी गौतमबौध्दनगरमधल्या ग्रेटर नोएडामध्ये 1000 एकरात उभी करण्यात
येणार आहे. या फिल्मसिटीमुळे निर्मात्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल
आणि रोजगारही वाढेल.”

सप्टेंबर महिन्यात लखनऊमध्ये योगी आदित्यनाथ
यांनी केलेल्या घोषणेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी
योगी आदित्यनाथ यांना आव्हान दिलं.

“हिंमत असेल तर फिल्मसिटी
उत्तरप्रदेशला नेऊन दाखवा,” असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी म्हटलं. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास
महामंडळाकडून आयोजित केलेल्या सत्रात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले
“बॉलीवूड क्षेत्राला सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. त्या
समस्या सरकारकडून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. दादासाहेब फाळके यांनी
ज्या भूमीत चित्रपटसृष्टीची मूहूर्तमेढ रोवली त्याठिकाणी मी तुम्हाला
काहीही कमी पडू देणार नाही.”

या दरम्यान फिल्मसिटी मुंबई बाहेर
नेण्याचा डाव असण्याच्या आरोपावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये राजकीय
वादंग पेटल्याचं चित्र दिसलं.

‘दुसर्‍यांच्या ताटातील घास हिसकावू नका’

या
राजकीय वादंगाला मागच्या काही दिवसांत थोडा ब्रेक मिळाला. पण योगी
आदित्यनाथ यांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यामुळे हा राजकीय वाद पुन्हा पेटला.

कॉंग्रेसचे
नेते आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी योगी आदित्यनाथ यांच्या
दौऱ्यावर टीका करताना म्हटलं आहे, “भाजपच्या पाच वर्षांच्या काळात
महाराष्ट्रातले अनेक उद्योग आणि कार्यालये गुजरातला पळवली गेली.
महाराष्ट्रातले सरकार बदलले तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलीवूडचे
लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते आहे.”

अशोक चव्हाण यांनी
योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर राज्यातील भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका
केली आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता
ते म्हणाले “बॉलीवूड किंवा कुठलाही उद्योग ज्याने महाराष्ट्रात रोजगार
निर्माण होणार असेल तो कुठेही नेण्याचं कारणं नाही. एखाद्यावेळी अशाच
प्रकारचा उद्योग आपल्या राज्यात सुरू करावा याच्या अभ्यास करण्यासाठी योगी
आदित्यनाथ मुंबईत येत असतील.”

प्रत्येक राज्याला त्यांची औद्योगिक
आणि आर्थिक प्रगती करण्याचा अधिकार नाही का? यावर कॅबिनेट मंत्री अशोक
चव्हाण म्हणतात,”सर्व राज्यांची प्रगती झाली पाहीजे. त्यासाठी केंद्राने
आणि राज्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. पण ताकदीच्या बळावर
दुसऱ्याच्या ताटातील घास हिसकावून पोट भरणे योग्य नाही.”

हा फक्त
बॉलीवूडचा प्रश्न आहे की योगी आदित्यनाथ यांच्या माध्यमातून भाजप
महाराष्ट्रात आणून प्रखर हिंदूत्वाची किनार असलेलं राजकारण करू पाहतंय?

हा
प्रश्न आम्ही जेष्ठ पत्रकार अभिजीत ब्रह्मनाथकर यांना विचारला असता ते
म्हणाले. “योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रात उत्तरप्रदेश सरकारच्या कामासाठी
येत आहेत. फिल्मसिटी उत्तरप्रदेशात उभी करण्याचा प्रयत्न याआधी मुलायमसिंह
सरकारच्या काळात झाला. पण तो तितकासा यशस्वी झाला नाही. चित्रपट निर्मितीची
बरीच कार्यालयं दिल्लीत आहेत. पण मुंबई इतकी यशस्वी चित्रपटसृष्टी उभी
करणं शक्य झालं नाही. इतका इतिहास समोर असताना फिल्म सिटीचा मुद्दा पुढे
करून रोजगार निर्मितीची प्रतिमा तयार करणं हा राजकीय हेतू असू शकतो.
याव्यतिरिक्त कोणतं राजकारण असेल असं वाटत नाही.”

फिल्म उद्योग उत्तरप्रदेशला हलवणं अशक्य?

मुंबईमधल्या
चित्रपट निर्मितीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. इतकी वर्षे सिनेमा आणि
मनोरंजन क्षेत्राची पाळंमुळं ही मुंबईत रुजलेली आहेत.

राजकीयदृष्ट्या
‘बॉलीवूडचे लचके तोडण्याचा डाव’ वगैरे बोललं जात असलं तरी मुंबईत
स्थिरावलेलं सिनेमा आणि मनोरंजन क्षेत्र इतक्या सहजपणे दुसर्‍या राज्यात
हलवणं शक्य आहे का?

हा प्रश्न आम्ही जेष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर
यांना विचारला असता ते सांगतात, “आपल्या देशात 1896 साली पहिलं स्क्रीनिंग
झालं. ते ही मुंबईत. दादासाहेब फाळके यांनी पहीला चित्रपट राजा हरिश्चंद्र
निर्माण केला. दादरमधल्या मथुरा भवनमध्ये या चित्रपटाचा स्टुडिओ उभा केला
आणि गिरगावातील कॉरोनेशन प्रदर्शित झाला.

“इतक्या वर्षांपूर्वीची
पाळंमुळं ही मुंबईत रुजलेली आहेत. आज मध्य मुंबईपासून वसई-मिरारोडपर्यंत
सिनेमांची शूटिंग होतात. ठाण्याच्या घोडबंदरपर्यंत मराठी डेलीसोपचं शूटिंग
दिसतं. शूटिंगसाठी नवीन जागा पाहीजेत म्हणून चित्रपटसृष्टी ही प्रचंड
प्रमाणात पसरत गेली. काही नवीन प्रयोग हे परदेशातही झाले. तसेच प्रयोग
भविष्यात उत्तर प्रदेशमध्ये होऊ शकतात. उत्तर प्रदेशची फिल्मसिटी हा
चित्रपटसृष्टीला चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो,” ठाकूर सांगतात.

दिलीप
ठाकूर आता होणार्‍या राजकारणाबाबत बोलताना पुढे सांगतात, “अनेक कलाकारांची
घरं मुंबईत आहेत. बरचसं मनुष्यबळ, इतर साधनं इथे आहेत. एखाद्या शूटींगसाठी
निर्माते परदेशात गेले तरी ते काही विशिष्ट काळासाठी जातात. त्याने पूर्ण
क्षेत्र परदेशात गेलं असं नाही होत. त्यामुळे राजकारणासाठी हे बोललं जात
असू शकत पण मुंबई व्यतिरिक्त 100% उत्तर प्रदेशच्या फिल्मसिटीचा
चित्रपटसृष्टीत विचार होणं हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!