
दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । सातारा । साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सनपाने गावचा सुपुत्र ओंकार मधुकर पवार यानं युपीएससीमध्ये देशात गुणवत्ता यादीत १९४ वा क्रमांक मिळवून तर माण तालुक्यातील अमित लक्ष्मण शिंदे (भांडवली, तेलदरा ता. माण) हा गुणवत्ता यादीत५७० क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
आयएएस व्हायचं स्वप्न पूर्ण केलंय. दोन वर्षांपूर्वी ओंकारची यूपीएससीमधून पॅरामिल्ट्री फोर्समध्ये अधिकारी, तर त्यानंतर त्याची आयपीएससाठी देखील निवड झाली होती. परंतु आयएएस व्हायचं स्वप्न त्याला गप्प बसून देत नव्हतं.
अथक परिश्रम आणि कष्टातून ओंकारनं देशात गुणवत्ता यादीत १९४ वा क्रमांक मिळवला. ओंकारचं प्राथमिक शिक्षण प्राथमिक सनपाने इथं तर माध्यमिक न्यू इंग्लिश स्कूल, हुमगांव (ता जावळी)इथं झालं. त्यानंतर कराड व पुणे येथून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. ओंकारचे वडील हे शेतकरी असून अतिशय कष्ट आणि मेहनतीनं त्यानं आपलं स्वप्न पूर्ण केलंय. त्याचं संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.
आयोगानं १७ मार्च रोजी नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ आयोजित केली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिल ते २६ मे २०२२ या कालावधीत घेण्यात आल्या. या परीक्षेच्या माध्यमातून नागरी सेवेतील ७१२ पदं भरली जाणार आहेत. दरम्यान यूपीएससी’त च्या निकालात सातारा जिल्ह्यानं देखील बाजी मारली असून जावळीच्या ओंकार पवारनं यूपीएससीत देशात गुणवत्ता यादीत १९४ वा क्रमांक मिळाली असून माण तालुक्यातील अमित लक्ष्मण शिंदे (भांडवली, तेलदरा ता. माण) हे गुणवत्ता यादीत ५७० क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.